
गुहागर सरस महोत्सवाला पर्यटकांसह स्थानिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांच्या हस्ते उद्घाटन


उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, जिल्हा परिषद रत्नागिरी व पंचायत समिती गुहागर यांच्या वतीने “गुहागर सरस महोत्सव २०२५”चे आयोजन गुरुवारपासून पोलीस परेड ग्राउंड तहसील कार्यालय मागे गुहागर येथे करण्यात आले आहे.
ग्रामीण भागातील स्वयंसहाय्यता समूहातील महिलांच्या कौशल्याचे आणि उत्पादित मालाचे प्रदर्शन व विक्रीसाठी आयोजित या महोत्सवाचे उद्घाटन जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले. यावेळी गुहागर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी शेखर भिलारे, गुहागर नगरपंचायतचे मुख्याधिकारी स्वप्निल चव्हाण, नायब तहसीलदार विद्याधर वैशंपायन,उमेदच्या तालुका अभियान व्यवस्थापक दूर्वा ओक, राहिला बोट, कक्ष अधिकारी सुनील लोंढे, वरवेली सरपंच नारायण आगरे, विविध बँकांचे व्यवस्थापक, समुदाय संसाधन व्यक्ती, तसेच बचत गटातील प्रमुख महिला उपस्थित होत्या.
या सरस महोत्सवामध्ये ग्रामीण भागातून ३५, तर गुहागर नगरपंचायत कार्यक्षेत्रातील ५ बचत गटांचे विविध स्टॉल मांडण्यात आले होते. सरस महोत्सवामध्ये विविध प्रकारचे पापड, लोणचे घरगुती मसाले, घरगुती सरबते, ज्वेलरी कपडे, विविध खाद्यपदार्थे, विविध प्रकारची मच्छी, विविध प्रकारची पिठे तसेच विविध कोकणी उत्पादने माफक दरात उपलब्ध करण्यात आली आहेत.
पहिल्या दिवशी नाताळची सुट्टी असल्याने या महोत्सवाला प्रचंड प्रतिसाद मिळाला. या प्रदर्शनाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील बचत गटातील महिलांना विविध उत्पादनांच्या विक्रीसाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. या महोत्सवामध्ये विविध कलात्मक वस्तू, कोकणी मसाले, कोकणी मेवा, कोकणी खाद्य संस्कृती दालन तसेच अस्सल ग्रामीण चवीच्या खाद्यपदार्थांची मेजवानी मिळणार आहे.
बचत गटातील महिलांसाठी विविध फनी गेम्स ठेवण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे सर्व पर्यटकांसाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. बचत गटांनी उत्पादित केलेल्या मालाला विक्रीच्या स्वरूपात प्रतिसाद द्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांनी केले आहे.
ग्रामीण महिलांची जिद्द, त्यांच्यातील कला आणि खाद्यपदार्थांच्या चवीचे अप्रतिम दर्शन गुहागर सरस महोत्सवाच्या माध्यमातून सर्वांना होणार आहे. त्यामुळे या प्रदर्शनाला उपस्थित राहावे, असे आवाहन गटविकास अधिकारी शेखर भिलारे यांनी केले आहे.




