
कला दालनाच्या माध्यमातून नवनिर्माण हाय मध्ये विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेचा गौरव

रत्नागिरी-
रत्नागिरी येथील नवनिर्माण हाय या सीबीएसई शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या कल्पकतेतून साकारलेल्या कला दालन मध्ये विविध कलाकृतींचे भव्य व आकर्षक प्रदर्शन भरविण्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या सर्जनशिलतेला व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला आहे.

या कला दालनाचे उद्घाटन नवनिर्माण शिक्षण संस्थेचे चेअरमन अभिजित हेगशेट्ये, संचालिका सीमा हेगशेट्ये, संचालक परेश पाडगावकर, मुख्याध्यापक उल्हास सप्रे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी शाळेतील शिक्षकवृंद, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वारली पेटिंग ही थिम कला शिक्षक निखिल कांबळे यांनी दिली होती. त्यांच्या मार्गदर्शनाखाली या आर्ट गॅलरीमध्ये विद्यार्थ्यांनी तयार केलेली निसर्गचित्रे,वस्तुचित्रे, कार्टून पेंटिंग, ग्लास पेंटिंग, कॅनवास पेंटिंग, विविध विषयांवरील रेखाचित्रे, कल्पनाविश्व साकार करणारी चित्रे तसेच विविध रंगसंगतीतून व्यक्त केलेल्या कलाकृतींचा समावेश आहे. प्रत्येक कलाकृतीत विद्यार्थ्यांची निरीक्षणशक्ती, कल्पनाशक्ती आणि सर्जनशील दृष्टिकोन प्रकर्षाने दिसून येतो. लहान वयातच विद्यार्थ्यांनी दाखवलेली कला कौशल्ये उपस्थितांचे विशेष लक्ष वेधून घेत आहेत.
उद्घाटनप्रसंगी मार्गदर्शन करताना मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या कलेचे कौतुक केले. केवळ शैक्षणिक अभ्यासापुरते मर्यादित न राहता कला, संस्कृती व सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढतो तसेच त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास घडतो, असे मत त्यांनी व्यक्त केले.
हे कला दालन तीन दिवसांसाठी खुली राहणार असून पालक, विद्यार्थी व कला प्रेमींना या प्रदर्शनास भेट देऊन विद्यार्थ्यांच्या कलागुणांचा अनुभव घेता येणार आहे. या कला दालनात विविध गटातील यश संपादन केले आहे ते या प्रमाणे-
इयत्ता पहिली ते चौथी गट- जिया किशोर सूर्यवंशी – प्रथम, याकूब इम्रान बंद्री –द्वितीय, गौरेश रामचंद्र सावंत – तृतीय, अथर्व शांताराम कोकरे –उत्तेजनार्थ, अस्मी विष्णुदास ठाकूर – उत्तेजनार्थ.
इयत्ता पाचवी ते सातवी गट-रुद्र राजेंद्र पाटणकर – प्रथम,विभव राजेंद्र पाटणकर –द्वितीय, उमर इम्रान अलजी – तृतीय,आराध्य प्रकाश पालांडे – उत्तेजनार्थ श्रेया सुहास सागवेकर – उत्तेजनार्थ
इयत्ता आठवी ते बारावी गट-
खेमराज श्यामजी गुप्ता – प्रथम,सान्वी गवस –द्वितीय,तीर्था राजेंद्र पाटणकर – तृतीय,पूर्वा सचिन ढोपटे – उत्तेजनार्थ,सिया हरेश गजरा – उत्तेजनार्थ,
मृदुला समीर गुरव – उत्तेजनार्थ.



