
ओळख महाभारताची भाग ११ धनंजय चितळे
देवव्रत भीष्म
कीर्तनसंध्येच्या निमित्ताने गतवर्षी लिहिलेल्या लेखमालेमध्ये श्री विष्णुसहस्रनाम या लेखात भीष्मांचा संदर्भ येऊन गेला आहे. भीष्म ही महाभारतातील एक अलौकिक व्यक्तिरेखा आ.हे आपल्या पित्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी स्वतः आजन्म ब्रह्मचर्यपालनाची प्रतिज्ञा करणारे पितामह भीष्म ‘भीष्म प्रतिज्ञा’ या शब्दप्रयोगाने जणू अमर झाले आहेत.
महाभारतातील असे अनेक शब्दप्रयोग मराठीमध्ये रूढ झालेले दिसतात. जसे ‘कर्णसारखा उदार’, ‘हा सूर्य हा जयद्रथ’, ‘विदुराघरच्या कण्या’. एखाद्या घरामध्ये आयत्यावेळी पाहुणे आले आणि घरातल्या अन्नपूर्णेने त्याही प्रसंगात सर्वांना पुरेसे भोजन दिले, तर कोणीतरी विचारतो, ”तुझ्याकडे ‘ ‘द्रौपदीची थाळी’ आहे का?” इतकेच कशाला, एखाद्या गावात किंवा देशात खूप काही घडामोडी घडून गेल्या, तर आपण तेथे ‘महाभारत’ घडले, असे म्हणतो बरोबर ना? एखाद्या चांगल्या शिष्याला आपण ‘एकलव्याची’ उपमा देतो, त्या एकालव्याची कथाही महाभारतातच येते. त्याचे ‘शंभर अपराध’भरले. आता त्याला शासन होईल’, असे जेव्हा म्हटले जाते, तेव्हा भगवान श्रीकृष्ण आणि शिशुपाल यांच्यातील पांडवांच्या राजसूय यज्ञप्रसंगी घडलेला कथाभागच अभिप्रेत असतो. आमच्यात कितीही मतभेद असले तरी जेव्हा देशावर संकट येईल, तेव्हा आम्ही सारे एकजुटीने उभे राहू हे सांगताना ‘आम्ही सारे १०५’ असे म्हणणारे महाभारताचा आधार घेतात ना? जेव्हा एखादा माणूस अर्धसत्य बोलतो, तेव्हा त्याने “नरो वा कुंजरो वा” अशी भूमिका घेतली, असे म्हटले जाते. हा वाक्प्रचार महाभारतातलाच आहे.
वाचक हो, आता अधिक विषयांतर न करता आपण पितामह भीष्मांच्या व्यक्तिरेखेच्या चिंतनाकडे वळू या.
अष्टवसूपैकी पैकी एक असलेले, गंगापुत्र भीष्म हे भगवान श्रीपरशुरामांचे शिष्य होते. भगवान श्रीपरशुरामांनी त्यांना अंबेशी विवाह करण्याची आज्ञा केली, पण आपल्या प्रतिज्ञेशी प्रतारणा करणार नाही, असे म्हणत भीष्मांनी आपल्या गुरूंबरोबर, परशुरामाबरोबर युद्धही केले. हे युद्ध अनिर्णीत राहिले, हाही एक प्रकारे भीष्मविजयच म्हणायला हवा. मूळ महाभारत वाचताना भीष्म हे हस्तिनापुराकडे कसे पाहत होते आणि त्यांची निष्ठा किती अचल होती, याचे दर्शन होते. पण त्याचवेळी त्यांनी द्रौपदी वस्त्रहरणासारख्या प्रसंगी मौन का बाळगले, असाही प्रश्न पडतो. जर आपण विवाहबद्ध झालो तर आपली पुढची संतती आणि शांतनु-सत्यवती यांची संतती यांच्यामध्ये भाऊबंदकी होईल. ती टाळण्यासाठी भीष्मांनी विवाह केला नाही. पण कौरव-पांडवांमधील युद्धात म्हणजे भाऊबंदकीतच त्यांचा बळी गेला, हा किती दैवदुर्विलास आहे? त्यांना शांतनुने इच्छामरणाचा वर दिला, तो वरही त्यांना सुख देऊन गेला की अन्य काही, असाच प्रश्न पडतो.
भीष्म, विदुर, द्रोण या सर्वांना दुर्योधनाचे चुकत आहे, हे कळत होते. पण राजगादीवर निष्ठा ठेवणाऱ्या या ज्येष्ठांनी आपल्या राज्याचे खरे हित कशात आहे, ते जाणले नाही, असे कधी कधी वाटून जाते. शकुनी हा या सर्वाला कारणीभूत आहे, असे महात्मा विदुर आणि पितामह भीष्म यांनी भर सभेत सांगितले होते. पण शकुनीला त्याच्या मूळ राज्यात पाठवण्याची हिंमत ते करू शकले नाहीत, ही शोकांतिका आहे. म्हणूनच भीष्मचरित्र द्रोणचरित्र नीट बारकाईने वाचली पाहिजेत आणि त्यातून काय करावे, काय करू नये, याचा योग्य तो बोध प्रत्येकाने घेतला पाहिजे.
(क्रमशः)




