
संगमेश्वर रोड रेल्वे स्टेशन येथे दोन दिवस उत्सवाचे वातावरण!जामनगर, पोरबंदर या एक्स्प्रेसना थांबा मिळाल्याचा आनंदोत्सव!
संगमेश्वर रोड रेल्वे स्टेशनसाठी हा आठवडा ऐतिहासिक ठरणार आहे.शुक्रवारी पोरबंदर एक्सप्रेस आणि शनिवारी जामनगर एक्सप्रेस या दोन्ही गाड्यांचे संगमेश्वर रेल्वे स्टेशनवर भव्य व जंगी स्वागत करण्यात येणार आहे.गेल्या अडीच वर्षांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर या दोन्ही महत्त्वाच्या गाड्यांना संगमेश्वर येथे थांबा मंजूर झाल्याने संगमेश्वर तालुका व परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
गुजरातकडे थेट रेल्वे संपर्क उपलब्ध झाल्यामुळे प्रवाशांची मोठी सोय होणार असून व्यापारी, विद्यार्थी व चाकरमान्यांसाठी हा निर्णय अत्यंत लाभदायक ठरणार आहे.
या स्वागत समारंभासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी, नागरिक, रेल्वेप्रेमी, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार व प्रवासी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. घोषणाबाजी, जल्लोष, फुलांच्या हारांनी सजलेले स्वागत आणि आनंदोत्सवाच्या वातावरणात हा ऐतिहासिक क्षण साजरा केला जाणार आहे.
शुक्रवार व शनिवार — संगमेश्वर रेल्वेच्या इतिहासातील अभिमानाचे व आनंदाचे दिवस ठरणार आहेत. त्यामुळे उद्या दिनांक २६ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी १;३० वाजता सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन या कार्यकमाचे आयोजक निसर्गरम्य चिपळूण संगमेश्वर (रेल्वे) फेसबुक ग्रुपच्या वतीने करण्यात आले आहे.




