
प्रधान डाकघर येथे डाकघर निर्यात केंद्र सुरू
रत्नागिरी, दि. 24 ): रत्नागिरी प्रधान डाकघर येथे डाकघर निर्यात केंद्र सुरू झाले असून छोट्या उद्योजकांनी यांचा फायदा घ्यावा, येणाऱ्या ख्रिसमस व नवीन वर्षाच्या शुभेच्छा सुद्धा पोस्ट ऑफिस मार्फत पाठवू शकता, असे आवाहन अधीक्षक डाकघर अ. द. सरंगले यांनी केले आहे.
भारत सरकार आता लोकल ग्लोबल माध्यमातून छोट्या उद्योजकांना निर्यात करण्यासाठी प्रवृत्त करीत आहे. अश्या छोट्या उद्योजकांना निर्यातीसाठी मार्गदर्शनसुद्धा पोस्ट ऑफिसच्या मार्फत मिळू शकते. पोस्ट ऑफिस मार्फत यावर्षी दिवाळीमध्ये परदेशातील आप्त स्वकीयांचे व मुलांचे तोंड फराळाने गोड केले. दिवाळीमध्ये जिल्ह्यातून एकूण ४० पार्सल विविध बारा देशात पाठविण्यात आली. खाजगी कुरीअरचा विचार करता पोस्ट ऑफिसचे दर अगदी वाजवी असून सामान्य माणसाच्या खिशाला परवडणारे आहेत. शैक्षणिक कालावधीमध्ये पालक काटकसर करून मुलांचे शिक्षण पूर्ण करीत असतात. अशा परदेशी शिक्षणाचा खूपच खर्च असतो. एवढे असूनही मुलांना घराचा, प्रेमाचा खाऊ मिळावा ही पालकांची इच्छा असते. परंतु खूप मोठे दर पाहता इच्छा असूनही पालक ते करू शकत नाहीत. डाक विभागाने ही सेवा नवीन स्वरुपात सुरू केली असून, कमीतकमी खर्चात आपण आपली भेटवस्तू आणि अन्य घरगुती उपयोगाचे साहित्य परदेशी पाठवू शकता.




