
महर्षी कर्वे महिला महाविद्यालयात मा. डॉ. विनय सहस्त्रबुद्धे यांचे करिअर आणि कौशल्य विकासात महिलांची भूमिका या विषयावरती प्रेरणादायी मार्गदर्शन
रत्नागिरी, दि. २४ डिसेंबर २०२५ :
महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था संचलित महर्षी कर्वे महिला महाविद्यालय, रत्नागिरी येथे “स्वत: पासून समाजापर्यंत : करिअर आणि कौशल्य विकासात महिलांची भूमिका” या विषयावर एक प्रेरणादायी मार्गदर्शनपर कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. महिलांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते व यानिमित्ताने माजी राज्यसभा सदस्य डॉ. विनय सहस्त्रबुद्धे, यांनी संस्थेला सदिच्छा भेट दिली व व्याख्यान झाले.
कार्यक्रमाची सुरुवात दुपारी ३.०५ वाजता स्वागताने झाली. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. आश्रमगीताने कार्यक्रमाला मंगल वातावरणाची जोड दिली. प्रकल्प समन्वयक श्री स्वप्निल सावंत यांनी आपल्या प्रास्ताविकातून कार्यक्रमामागील संकल्पना स्पष्ट करत महिलांनी शिक्षणाबरोबरच कौशल्य विकासावर भर देणे काळाची गरज असल्याचे नमूद केले.
यानंतर प्रमुख मान्यवरांची ओळख करून देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. संस्थेच्या रत्नागिरी येथील वाटचालीचा एकूण आढावा C.A. आनंद पंडित यांनी सादर केला. त्यांनी संस्थेने शिक्षण, सामाजिक बांधिलकी आणि महिला सक्षमीकरणासाठी केलेल्या कार्याचा उल्लेख केला.
कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते मा. डॉ. विनय सहस्रबुद्धे (माजी राज्यसभा सदस्य) यांनी आपल्या अभ्यासपूर्ण भाषणात महिलांच्या करिअर घडणीत कौशल्य विकास, आत्मविश्वास, नेतृत्वगुण आणि समाजाभिमुख दृष्टिकोन यांचे महत्त्व विशद केले. महिलांनी स्वतःच्या प्रगतीबरोबरच समाजाच्या उन्नतीसाठीही सक्रिय भूमिका घ्यावी, असे त्यांनी आवाहन केले. त्यांच्या मार्गदर्शनपर विचारांना उपस्थित विद्यार्थीनींकडून भरभरून प्रतिसाद मिळाला.
कार्यक्रमाच्या शेवटी आभार प्रदर्शन करण्यात आले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.
या कार्यक्रमास मा. श्री अभिजीत सहस्त्रबुद्धे, संस्थापक व संचालक स्काय रोबोटिक Pvt Ltd, महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था रत्नागिरीचे प्रकल्प प्रमुख मा. श्री मंदार सावंत देसाई, स्थानीय व्यवस्थापन समिती सदस्य श्री. प्रसन्न दामले, श्री. कृष्णमूर्ती बुक्का, संस्थापक स्काय रोबोटिक Pvt Ltd, BCA प्र. प्राचार्य स्नेहा कोतवडेकर, नर्सिंग प्र. प्राचार्य समीना मुलानी मॅडम, सौ संपदा जोशी मॅडम, प्राध्यापकवृंद, कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थीनी उपस्थित होत्या. सदर कार्यक्रमामुळे विद्यार्थीनींमध्ये करिअरविषयक सकारात्मक दृष्टीकोन निर्माण झाला.




