
रत्नागिरी शहराजवळील मिरजोळे हनुमाननगर, समर्थनगर येथे रस्त्यावर दोन गव्यांचे दर्शन
रत्नागिरी शहराजवळील मिरजोळे हनुमाननगर, समर्थनगर येथे रस्त्यावर दोन गव्यांचे दर्शन झाले. भररस्त्यावर येऊन उभ्या राहिलेल्या गव्यांमुळे मिरजोळे गावात जाणारी वाहने खोळंबली. सुमारे दीड तास गवे एकाच जागेवर उभे राहिल्यामुळे ग्रामस्थांची अडचण झाली. अवाढव्य गव्यांना पळवून लावण्याचे धाडस कुणालाच झाले नाही. काही वेळाने स्थानिक नागरिकांनी फटाके वाजवल्यानंतर त्या आवाजाने गव्यांनी धूम ठोकली.
हा प्रकार शनिवारी रात्रीच्या सुमारास घडला. मिरजोळे येथील रहिवासी शनिवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास घरी जात होते. त्याचवेळी रस्त्याच्या मधोमध दोन गवे आढळले. सुरुवातीला पाळीव जनावरे असतील असे वाटले; पण चारचाकी वाहनाच्या प्रकाशात सफेद पाय आणि तपकिरी रंग पाहिल्यावर ते गवे असल्याचे लक्षात आहे.
ते दोन्ही गवे वाट चुकल्यामुळे मिरजोळेच्या रस्त्यावर आल्याचा अंदाज होता. रस्त्याच्या मधोमध ते उभे असल्यामुळे त्यांच्या बाजूने वाहन हाकणेही धोकादायक होते. त्यामुळे वाहनचालकांची पंचाईत झाली.
मार्ग सापडत नसल्यामुळे दोन्ही गवे शांतपणे एकाच जागेवर उभे होते. बराचवेळ झाला तरीही हालचाल करत नसल्याने जवळच राहणाऱ्या ग्रामस्थांनी फटाक्यांचा आवाज केला. त्या आवाजाने ते पळून गेले. गवे दिसण्याची ही पहिलीच घटना आहे.




