
कोल्हापूर! आराम बसवर 1 कोटी 22 लाखांचा दरोडा अन् 12 तासांत सात आरोपी जेरबंद
कोल्हापुरातून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या आराम बसवर दरोडा टाकणाऱ्या सात जणांच्या टोळीला कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने 12 तासाच्या आत जेरबंद केले असून, चोरलेला 1 कोटी 22 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.अवघ्या 12 तासांत गुन्हा उघडकीस आल्याने पोलिसांच्या तत्परतेचे नागरिकांकडून कौतुक होत आहे.
कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याच्या सीमेवर सोमवारी रात्री 12 वाजता सात चोरट्यांनी आराम बसच्या क्लिनरच्या गळ्याला कोयता लावून गाडी थांबवण्यास भाग पाडले होते. त्यानंतर जवळपास 1 कोटी 22 लाखाचे चांदी आणि सोने आणि काही पार्ट्स चोरले होते. या प्रकरणी वडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचं गांभीर्य ओळखून कोल्हापूर पोलिसांनी टीम तयार केली आणि 12 तासाच्या आत दरोडा टाकणाऱ्या टोळीला ताब्यात घेत मुद्देमाल जप्त केला आहे.पोलिसांच्या तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, आरोपींनी आधी वाहनाचा पाठलाग केला. योग्य संधी साधत त्यांनी वाहन अडवले. चालकावर हल्ला केला आणि चांदी, सोने तसेच मोबाईल स्पेअर पार्ट्सने भरलेले पार्सल जबरदस्तीने हिसकावून नेले. हा गुन्हा पूर्णतः नियोजनबद्ध असल्याचे पोलिस तपासातून स्पष्ट झाले. या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचे विशेष पथक तयार करण्यात आले. घटना घडलेल्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे मुख्य आरोपी अक्षय कदम (रा. विकमनगर, कोल्हापूर) याला ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर आणखी सहा साथीदारांना अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी अटक करण्यात आलेल्या सर्व आरोपींकडून चोरीचा संपूर्ण मुद्देमाल हस्तगत केला आहे. पुढील तपास वडगाव पोलिस करत आहेत. पोलिस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता, अपर पोलिस अधीक्षक अण्णासाहेब जाधव आणि उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.




