
दुचाकी आणि कारच्या धडकेनंतर रस्त्यावर पडलेल्या महिलेच्या डोक्यावरून ट्रकचे चाक गेल्याने महिलेचा मृत्यू
राजापूर तालुक्यातील रायपाटण टक्केवाडी येथे बुधवारी सकाळी सुमारे १० वाजण्याच्या सुमारास एक भीषण अपघात घडला. या अपघातात ७५ वर्षीय वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू झाला. पार्वती तानू तरळ (रा. शिवणे बुद्रुक) असे अपघातात मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. दुचाकी आणि कारच्या धडकेनंतर रस्त्यावर पडलेल्या या महिलेच्या डोक्यावरून ट्रकचे चाक गेल्याने ही दुर्दैवी घटना घडली.पुण्यातील पिंपळे सौदागर येथील रहिवासी तेजस शेलार हे आपल्या कुटुंबीयांसह क्रेटा कार (क्रमांक एमएच १४ एमएल ९६१८) मधून पुण्याहून कुणकेश्वर येथे देवदर्शनासाठी जात होते. गाडीत लहान मुले व इतर कुटुंबीय प्रवास करत होते. रायपाटण टक्केवाडी परिसरात आल्यानंतर, पाचल गुरववाडी येथील दुचाकीस्वार कुणाल धावडे याने आपल्या दुचाकीने या कारला मागून धडक दिली.
या अचानक झालेल्या धडकेमुळे दुचाकीच्या मागे बसलेल्या पार्वती तरळ यांचा तोल गेला आणि त्या रस्त्यावर कोसळल्या. त्याच वेळी रत्नागिरीहून पाचलच्या दिशेने जाणारा एक मालवाहू ट्रक (क्रमांक एमएच ०८ एक्यू ७२६६) घटनास्थळावरून जात होता. दुर्दैवाने रस्त्यावर पडलेल्या पार्वती तरळ या ट्रकच्या मागील चाकाखाली आल्या. ट्रकच्या चाकाखाली चिरडल्या गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.




