
अख्या देशाचे डोळे लागून राहिलेल्या उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीची अखेर आज मुंबईतून घोषणा
फक्त महाराष्ट्राचेच नाही तर अख्या देशाचे डोळे लागून राहिलेल्या उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीची अखेर आज (दि. २४ डिसेंबर) मुंबईतून घोषणा करण्यात आली.ब्लू सी हॉटेलमध्ये झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत याची घोषणा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी केली. यावेळी स्टेजवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे उपस्थित होते. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी आता चुकलात तर संपूर्णपणे संपून जाल अशी भावनिक साद मराठी माणसाला घातली.
यावेळी प्रथम राज ठाकरे यांना बोलण्याची विनंती उद्धव ठाकरे यांनी केली. मात्र राज ठाकरे यांनी इशाऱ्यानेच उद्धव ठाकरेंना तुम्ही पहिल्यांदा बोला असे सुचवले. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी याबाबतीत देखील आमचं एकमत झालं असल्याचं सांगितलं.
यानंतर उद्धव ठाकरेंनी बोलण्यास सुरूवात केली. त्यांनी संजय राऊत यांच्या महाराष्ट्राच्या मंगल कलषाचा धागा पकडून आपलं बोलणं सुरू केलं. ते म्हणाले, ‘महाराष्ट्राचा मंगल कलश हा सत्यनारायण पूजेसारखा आणला गेला नाही. त्यामागे संघर्ष असून १०५, १०७ किंवा त्यापेक्षा जास्तच मराठी लोकांचे बलीदान दिले गेले असं सांगितलं.’
दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी मुंबई महाराष्ट्रीतच ठेवण्यासाठी ठाकरे कुटुंबियांचे योगदान किती होत हे देखील नमुद केलं. ते म्हणाले, ‘मुंबई महाराष्ट्राला मिळाल्यानंतर मुंबईच्या उरावर उपरे नाचू लागले. त्यावेळी बाळासाहेबांनी शिवसेनेला जन्म दिला. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत पहिल्या पाच सेनापतींमध्ये आमच्या दोघांचे आजोबा प्रबोधनकार ठाकरे होते. त्यात माझे वडील बाळासाहेब आणि काका श्रीकांतजी ठाकरे देखील होते. म्हणजे मुंबईसाठी संघर्ष करण्यात अख्ख ठाकरे कुटुंबीय होतं.’
उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, ‘आमचं कर्तव्य म्हणून आम्ही एकत्र आलो आहोत. एकत्र आलो आहोत ते एकत्र राहण्यासाठी.’ उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांनी शिवसेनाला का जन्म देखील थोडक्यात सांगितलं. ठाकरेंनी दिल्लीत बसलेल्या दोघांचे मुंबई फोडण्याचे मनसुबे आहेत असं म्हणत अप्रत्यक्षरित्या भाजपच्या केंद्रीय नेतृत्वावर टीका केली.
उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राला अन् तमाम मराठी बांधवांना एक भावनिक साद घातली. त्यांनी भाजपनं विधान सभेला अपप्रचार करणारा बटेंगे तो कटेंगे असा नारा दिला होता. त्याला तुम्ही भुललात. आता मी मराठी माणसाला आवाहन करून इच्छितो की जर तुम्ही चुकाल तर संपाल… आता जर फुटलात तर पूर्णपणे संपून जाल अशी भावनिक साद घातली.




