
मुंबई-गोवा महामार्ग : पनवेल ते इंदापूर कामाच्या पूर्णत्वासाठी आता मार्चचा मुहूर्त; प्रकल्पाचे ९० टक्क्यांहून अधिक काम पूर्ण!
मुंबई : मुंबई – गोवा महामार्गावरील पनवेल – इंदापूर टप्प्याच्या कामाला विलंब होण्याची चिन्हे आहेत. या टप्प्याचे काम तातडीने पूर्ण करून डिसेंबरअखेरीस महामार्ग वाहतूक सेवेत दाखल करण्याचे भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे (एनएचएआय) नियोजन होते. मात्र डिसेंबरचा मुहूर्त चुकला असून आता या कामाच्या पूर्णत्वासाठी एनएचएआयने मार्च २०२६ चा मुहूर्त धरला आहे. पनवेल – इंदापूर टप्प्याचे ९० टक्क्यांहून अधिक काम पूर्ण झाले असून आता केवळ दोन उड्डाणपुलाचे आणि पथकराचे काम शिल्लक आहे. हे काम मार्चमध्ये पूर्ण करून एप्रिलच्या सुरुवातीला हा टप्पा वाहतूक सेवेत दाखल केला जाणार आहे.
मुंबई, कोकण ते गोवा प्रवास सुकर आणि अतिजलद करण्यासाठी दुपदरी मुंबई – गोवा महामार्गाचे चौपदरीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला. या चौपरीकरणाच्या कामाला २०११ मध्ये सुरुवात करण्यात आली. मात्र आता १५ वर्षे झाली तरी मुंबई-गोवा अतिजलद प्रवासाची वाहनचालक – प्रवाशांची प्रतीक्षा संपलेली नाही. त्यामुळे वाहनचालक – प्रवाशांमध्ये प्रचंड नाराजी असून हा महामार्ग केव्हा पूर्ण होणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या महामार्गाच्या पनवेल – इंदापूर टप्प्याच्या कामाला विलंब होताना दिसत आहे. पनवेल – इंदापूर दरम्यानच्या ८४ किमी लांबीच्या टप्प्याचे काम डिसेंबरमध्ये पूर्ण करून हा टप्पा सेवेत दाखल करण्यात येईल, असे एनएचएआयकडून जाहीर करण्यात आले होते.
त्यामुळे पनवेल – इंदापूर प्रवास सव्वातासात पूर्ण करण्यासाठी वाहनचालक – प्रवाशांना मार्च २०२६ पर्यंत वाट पाहावी लागणार आहे. काही कारणांमुळे डिसेंबरपर्यंत या टप्प्याचे काम पूर्ण करणे शक्य झाले नाही. आता या टप्प्याचे काम लांबणीवर पडल्याची माहिती एनएचएआयमधील सूत्रांनी दिली.
मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वरील पनवेल – इंदापूर दरम्यानच्या ८४.६०० किमी लांबीच्या महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम दोन टप्प्यांत करण्यात येत आहे. पनवेल – कासू दरम्यानच्या ४२.३ किमी लांबीचा एक टप्पा असून या टप्प्याचे काम मे. जे. एम. म्हात्रे इन्फ्रा प्रा. लिमिटेडकडून करण्यात येत आहे. तर कासू – इंदापूर या ४२.३०० किमी लांबीच्या महामार्गाचे काम मे. कल्याण टोल इन्फ्रा प्रा. लिमिटेड करीत आहे. या टप्प्यासाठी ४५० कोटी रूपये खर्च अपेक्षित आहे. पनवेल – कासू टप्प्याचे अंदाजे ९८ टक्के आणि कासू – इंदापूर टप्प्याचे अंदाजे ८५ टक्के काम पूर्ण झाले आहे.
आता कोलाड उड्डाणपुलासह आणखी एका उड्डापुलाचे आणि खारपाडा तसेच सुकेळी येथील पथकर नाक्याचे काम शिल्लक आहे. या कामाला वेग देण्यात आला असून मार्चपर्यंत ही कामे पूर्ण करण्यात येतील, असेही सूत्रांनी सांगितले. मार्चमध्ये काम पूर्ण करून एप्रिलच्या सुरुवातीस हा टप्पा वाहतूक सेवेत दाखल झाल्यास वाहनचालक – प्रवाशांना पनवेल – इंदापूर प्रवास सव्वा तासात पूर्ण करता येणार आहे.




