
उद्या ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होणार
ठाकरे बंधूंच्या युतीची उद्या दुपारी १२ वाजता अधिकृत घोषणा होणार असून, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि मनसे मुंबई महानगरपालिका निवडणूक एकत्रितपणे लढणार आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे अनेक वर्षांनंतर एकाच व्यासपीठावर येऊन युतीची घोषणा करणार आहेत.शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांनी आज (दि. २३) याबाबत माहिती दिली.महाराष्ट्रातील महानगरपालिकांच्या निवडणुकांतील शिवसेना ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जागावाटप अद्याप अंतिम झाले नसले तरी बुधवारी (दि. २४) दुपारी १२ वाजता युतीची घोषणा होणार आहे. खासदार संजय राऊत यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर पोस्ट करून या संदर्भात माहिती दिली. दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवसेनेला १०० पेक्षा अधिक जागा, मनसेला ६० ते ७० जागा आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला १५ ते २० जागा मिळण्याची शक्यता आहे. मराठी बहुल भागातील ५० टक्के जागांवर शिवसेना आणि ५० टक्के जागांवर मनसे लढेल, असे नियोजन आहे.
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या बंधुंची युती झालेलीच आहे. मनसे आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी युती स्वीकारलेली असून कोणताही संभ्रम नाही. फक्त घोषणा करायचा विषय आहे, असे राऊत यांनी तत्पुर्वी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले होते. “मुंबई आणि इतर पालिकेत कार्यकर्त्यांकडून सोबत काम करायला सुरुवात झाली आहे, तशा सूचना दिल्या आहेत. युती झाली आहे, फक्त जागावाटवपाबाबत काल रात्री शेवटची भेट झाली आहे. राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येऊन घोषणा करतील. नाशिकमध्ये चर्चा आटोपली आहे. पुणे, ठाणे, मीरा भाईंदर, कल्याण, डोंबिवली या ठिकाणी जागावाटप झाले आहे,” असेही राऊत यांनी सांगितले.



