
गुहागर नगर पंचायत निवडणुकीत मनसेच्या कोमल जांगळी यांचा ऐतिहासिक विजय
मनसे गुहागर तालुका संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी यांच्या हस्ते सत्कार
गुहागर नगर पंचायत निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक ४ मधून महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) पुरस्कृत उमेदवार कोमल दर्शन जांगळी यांनी ऐतिहासिक दणदणीत विजय प्राप्त केला आहे. कोमल जांगळी यांच्या विजयामुळे गुहागर तालुक्यात मनसेने आपली संघटनात्मक ताकद ठळकपणे सिद्ध केली असून, तालुक्यातील मनसेची नगरसेविका म्हणून निवडून आलेली पहिलीच उमेदवार ठरली आहे.
संपूर्ण निवडणूक प्रक्रियेत कोमल जांगळी यांनी स्थानिक प्रश्नांवर आधारित प्रचार, मतदारांशी थेट संवाद आणि विकासाभिमुख दृष्टीकोन मांडत नागरिकांचा विश्वास संपादन केला. त्याला मतदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत भरघोस मतांनी विजयी कौल दिला.
या ऐतिहासिक यशाबद्दल पक्ष नेतृत्व, पदाधिकारी, कार्यकर्ते व समर्थकांकडून कोमल जांगळी यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. हा विजय आगामी काळात गुहागर नगर पंचायत क्षेत्रातील विकासाला नवी दिशा देईल, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे. गुहागर तालुक्यात मनसेच्या वाटचालीसाठी हा विजय मैलाचा दगड ठरत असून, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पक्षाच्या प्रभावी उपस्थितीची नांदी म्हणून या निकालाकडे पाहिले जात आहे.
कोमल जांगळी निवडून आल्यानंतर त्यांचा गुहागर मनसेच्या वतीने तालुका संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी, उपजिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर, तालुकाध्यक्ष सुनील हळदणकर व सर्व कार्यकर्त्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यानंतर विजयाची भव्य रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये डीजेच्या तालावर सर्व मनसे सैनिकांनी नाचून, गुलाल उधळत, फटाक्यांची आतिषबाजी करत विजयाचा आनंद घेतला.
या रॅलीमध्ये तालुका संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी, उपजिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर, तालुकाध्यक्ष सुनील हळदणकर, सहसंपर्क अध्यक्ष समीर जोयशी, विद्यार्थी सेना अध्यक्ष प्रथमेश रायकर तालुका सचिव प्रशांत साठले उप तालुका अध्यक्ष अमित खांडेकर, जितेंद्र साळवी माजी शहर अध्यक्ष नवनाथ साखरकर, गुहागर शहर अध्यक्ष अभिजीत रायकर, दर्शन जांगळी, शृंगारतळी शहर अध्यक्ष वेदांत देवळेकर, विश्वजीत पोद्दार व सर्व कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला होता.




