
रत्नागिरीतील सत्त्वश्री प्रकाशनाच्या ई-बुकचे तंजावरला प्रकाशन
रत्नागिरी : येथील सत्त्वश्री प्रकाशनाच्या “छत्रपती शिवाजी महाराजांचा दक्षिण दिग्विजय” या ई-बुकचे प्रकाशन तंजावर (तमिळनाडू) येथे झाले.
तमिळ विद्यापीठ, महावीर महाविद्यालय (कोल्हापूर), देवचंद महाविद्यालय (अर्जुननगर), शिवीम संस्था आणि शिवाजी विद्यापीठ इतिहास परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने तंजावर येथील तमिळ विद्यापीठांमध्ये “तंजावर मराठी राज्य : इतिहास भाषा साहित्य आणि संस्कृती” या विषयावर तीन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्र पार पडले. त्यामध्ये सोमवारी, दि. २२ डिसेंबर रोजी “छत्रपती शिवाजी महाराजांचा दक्षिण दिग्विजय” या रत्नागिरीतील कोकण मीडियाच्या सत्त्वश्री प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या ई-बुकचे प्रकाशन करण्यात आले. तंजावरचे महाराज श्रीमंत शिवाजीराजे भोसले यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन झाले. लांजा येथील लेखिका डॉ. विजयालक्ष्मी विजय देवगोजी यांनी लिहिलेले हे पुस्तक कोकण मीडियाच्या सत्त्वश्री प्रकाशनातर्फे प्रमोद कोनकर यांनी प्रकाशित केले आहे. सत्त्वश्री प्रकाशनाचे हे ३२ वे पुस्तक आहे.
कार्यक्रमास तमिळ विद्यापीठाचे भारतीय भाषा आणि तुलनात्मक साहित्य विभाग प्रमुख प्रा. एस. कविथा, तंजावरच्या मराठी पंडित सरस्वती महाल ग्रंथालयाचे बी रामचंद्र, शिवाजी विद्यापीठाच्या इतिहास विभागाचे प्रमुख डॉ. अवनीश पाटील, मराठी विभागप्रमुख डॉ. नंदकुमार मोरे, शिविम संस्थेचे अध्यक्ष डॉ. भरत जाधव, उपाध्यक्ष डॉ. मांतेश हिरेमठ, डॉ. प्रकाश दुकळे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.




