
ओळख महाभारताची भाग ८ धनंजय चितळे
तेजस्वी द्रौपदी
महाभारतातील प्रत्येक व्यक्तिरेखा विलक्षण आहे. प्रसंगाप्रसंगातून त्या व्यक्तिरेखेचे उलगडणारे पदर वाचकाला थक्क करून टाकतात. पुरुषांप्रमाणेच महाभारतातील स्त्रियाही कर्तृत्ववान होत्या. त्यातील एक म्हणजे द्रुपद राजाची कन्या द्रौपदी. या द्रौपदीचा जन्म अग्नीतून झाला आणि त्यावेळी आकाशवाणी झाली, “ही वरारोहा कृष्णा सर्व स्त्रियांमध्ये श्रेष्ठ असून क्षत्रियांचा संहार करण्याच्या इच्छेने अवतरली आहे.” महाभारताच्या आदिपर्वामध्ये हा प्रसंग आला आहे. यामध्ये वरारोहा या शब्दप्रयोगातून द्रौपदीचा सौंदर्यवती, सामर्थ्यसंपन्न आणि देवीस्वरूप या अर्थाने उल्लेख केलेला आढळतो. यज्ञातून प्रकट झालेली ही द्रौपदी पुढे पाच पांडवांची पत्नी झाली आणि म्हणूनच तिला पांचाली हे नाव मिळाले.
अग्नीसारखीच तेजस्वी असणारी द्रौपदी महाभारतातील सभापर्वामध्ये आपल्या अलौकिक बुद्धिमत्तेची चुणूक दाखवून जाते. सर्व काही हरलेल्या धर्मराजाला शकुनी मामा द्रौपदीला पणाला लाव, असे सांगतो आणि द्यूतप्रसंगी आपली सारासार विवेक बुद्धी हरवून बसलेला धर्मराज युधिष्ठिर त्याप्रमाणे द्रौपदीला पणाला लावतो आणि अर्थातच हरतो. आपल्या विजयामुळे उत्तेजित झालेला दुर्योधन आपला सारथी प्रतिकामी याला द्रौपदीकडे पाठवून तिला राजदरबारात आणण्याची आज्ञा करतो. प्रतिकाम्याकडून सभेत घडलेला वृत्तांत कळल्यानंतर द्रौपदी त्याला म्हणते, माझ्या वतीने तू धर्मराजाला एकच प्रश्न विचार की प्रथम तू स्वतःला हरलास आणि नंतर मला पणाला लावलेस की आधी मला पणाला लावलेस?'' द्रौपदीचा हा प्रश्न प्रतिकाम्याने सभेमध्ये येऊन सांगितल्यावर धर्मराजाने निरुत्तर होऊन मान खाली घातली. नंतर हाच प्रश्न जेव्हा भीष्म, द्रोण, कृप यांना विचारला गेला, तेव्हा त्यांनाही याचे उत्तर देता आले नाही. द्रौपदीचे सांगणे बरोबर आहे, असे प्रतिपादन त्यावेळी दुर्योधनाचा भाऊ विकर्ण याने केले. तो म्हणाला,मृगया, मद्यपान, गीत आणि स्त्रीसमागम यांचा अतिरेक ही चार राजव्यसने आहेत. या व्यसनात जो पुरुष आसक्त होतो, तो धर्म सोडून वागत असतो. अशा अयोग्य पुरुषांनी केलेले कोणतेही कृत्य समाज मानत नाही. शिवाय धर्माने स्वतःहून नाही तर विरुद्ध पक्षाच्या शकुनीने सांगितल्यानंतर द्रौपदीला पणाला लावले आहे. तसेच ती त्याची एकट्याची पत्नी नसून ती पांडवांची पत्नी आहे. म्हणून त्यावर धर्मराजाचा एकाधिकार नाही. अर्थात द्रौपदी जिंकली गेलेली नाही.” त्याच्या बोलण्याकडे लक्ष न देता दुर्योधनाने दुःशासनाला द्रौपदीची साडी फेडण्याची आज्ञा केली. त्यावेळचे द्रौपदीचे जळजळीत उद्गार आपल्याला वाचायला मिळतात. काही जण द्रौपदीला महाभारत युद्धाचे कारण मानतात, पण मला तसे वाटत नाही. प्रथम तिच्यावर अन्याय झाला आणि त्याचा प्रतिशोध घेतला गेला.
अर्थात या युद्धामध्ये द्रौपदीचे प्रतिविंध्य, सुतसोम, श्रुतकर्ता, शतानीक आणि श्रुतसेन हे पाचही वीरपुत्र मरण पावले. त्याआधी सुभद्रपुत्र अभिमन्यूचा मृत्यूही तिला पाहावा लागला. म्हणजे तिलाही पुत्रवियोगाचे दुःख सोसावे लागले.
महाभारतातील द्रौपदी ही भगवान श्रीकृष्णाची अनन्यभक्त आहे. त्याचीही सुंदर वर्णने ग्रंथात दिली आहेत. द्रौपदीचा पंचकन्यांमध्ये समावेश करण्यात आला आहेच. जैन महाभारतात तिला महासती असे म्हटले जाते. अशा शीलवती आणि आवेशवती असणाऱ्या द्रौपदी चरित्रानंतर गांधारी चरित्राचे अवलोकन करू या.
(क्रमशः)




