प्रसिद्ध दिग्दर्शिका सई परांजपे यांना ‘आशियाई चित्रपट संस्कृती पुरस्कार’ जाहीर!


मुंबई : आशियाई चित्रपट महोत्सवाच्या माध्यमातून गेली दोन दशकांहून अधिक काळ मुंबईकरांना आशियाई देशांमधील उत्तमोत्तम चित्रपट पाहण्याची संधी देणाऱ्या २२ व्या थर्ड आय चित्रपट महोत्सवाची घोषणा सोमवारी करण्यात आली.

९ जानेवारी ते १५ जानेवारी २०२६ दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवात यंदा प्रसिध्द लेखिका-दिग्दर्शिका पद्मभूषण सई परांजपे यांना ‘आशियाई चित्रपट संस्कृती पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. तर ख्यातनाम लेखिका, कास्टिंग डिरेक्टर उमा दा कुन्हा यांना ‘सत्यजित रे स्मृती पुरस्कार’ देऊन गौरवण्यात येणार आहे.

आशियाई चित्रपटांबरोबरच विविध भारतीय भाषांमधील चित्रपट पाहण्याची संधी देणाऱ्या ‘थर्ड आय’ आशियाई चित्रपट महोत्सवाचे आयोजन ९ जानेवारी ते १५ जानेवारी दरम्यान करण्यात आले आहे. यंदा महोत्सवात एकूण ५६ चित्रपटांची निवड करण्यात आली असून हे चित्रपट प्रभादेवीतील पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीचे मिनी थिएटर आणि ठाण्यातील लेक शोर मॉलमधील सिनेपोलीस चित्रपटगृहात दाखवले जाणार आहेत, अशी माहिती महोत्सवाचे संचालक संतोष पाठारे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. या महोत्सवाचे उद्धाटन बुसान चित्रपट महोत्सवात फ्रीप्रेस्की परीक्षक पुरस्कार पटकावलेल्या ‘ऑन युवर लॅप’ (पांगकू) या इंडोनेशियन चित्रपटाने होणार आहे. तसेच, महोत्सवातील महत्वाच्या पुरस्कारांबरोबरच दिवंगत चित्रपट अभ्यासक, समीक्षक यांच्या स्मृतीप्रित्यर्थ देण्यात येणारा चित्रपट लेखनाचा विशेष पुरस्कार चित्रपट अभ्यासक मिनाक्षी शेड्डे यांना देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी आशियाई चित्रपट फाऊंडेशनचे अध्यक्ष किरण व्ही. शांताराम आणि लेखक, गीतकार, दिग्दर्शक क्षितिज पटवर्धन उपस्थित होते.

‘गेली २२ वर्ष या महोत्सवाने आशियाई आणि भारतीय चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट कलाकृती महाराष्ट्रातील रसिकांपर्यंत पोहोचवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले आहे. यंदा माझे वडील डॉ. व्ही. शांताराम यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त त्यांच्या अजरामर कलाकृती दाखवण्यात येणार असून हा आमच्यासाठी विशेष आनंदाचा क्षण आहे’ असे किरण व्ही. शांताराम यांनी सांगितले. या महोत्सवात व्ही. शांताराम यांचे ‘दो आँखे बारा हाथ’, ‘डॉ. कोटनीस की अमर कहानी’, ‘कुंकू’ आणि ‘नवरंग’ हे चित्रपट रसिकांना पाहता येणार आहेत.

मराठी चित्रपट स्पर्धा विभागात अकरा मराठी चित्रपट

महोत्सवात मराठी चित्रपट स्पर्धा विभागात ‘एप्रिल मे ९९’, ‘सांगळा’, ‘गमन’, ‘गिराण’, ‘गोंधळ’, ‘किमिडीन’, ‘निर्जळी’, ‘प्रिझम’, ‘साबर बोंड’, ‘सोहळा’ आणि ‘उत्तर’ असे अकरा मराठी चित्रपट दाखवण्यात येणार आहेत. ‘थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवात मी दिग्दर्शित केलेला ‘उत्तर’ हा चित्रपट दाखवला जाणार आहे, याचा मला आनंद वाटतो. मराठी चित्रपटांना स्पर्धा विभागात सहभागी करून घेत आंतरराष्ट्रीय दर्जाच्या चित्रपटांबरोबर प्रदर्शित करणे ही मराठी चित्रपटसृष्टीसाठी महत्त्वाची संधी असून त्यामुळे नवीन चित्रपटर्मींना प्रोत्साहन मिळते’ अशी भावना दिग्दर्शक क्षितीज पटवर्धन यांनी व्यक्त केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button