
नववर्ष स्वागतासाठी किल्ल्यांवर ‘खडा पहारा’ मोहीम
रत्नागिरी : गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठानच्या (महाराष्ट्र राज्य) रत्नागिरी विभागामार्फत मंगळवारी (३१ डिसेंबर) रत्नागिरीतील ऐतिहासिक किल्ले रत्नदुर्ग व किल्ले पूर्णगड येथे खडा पहारा मोहीम राबविण्यात येणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचे साक्षीदार असलेल्या या किल्ल्यांचे संवर्धन, संरक्षण व नववर्षाचे स्वागत शिवप्रेरणेने करण्याच्या उद्देशाने ही मोहीम आयोजित करण्यात आली आहे. मद्य, फटाके, गैरप्रकार व असामाजिक कृत्यांना आळा घालून किल्ल्यांची पवित्रता जपण्यासाठी ही रात्रभर चालणारी पहारा मोहीम राबविण्यात येणार आहे.ही मोहीम सायंकाळी ६ वाजल्यापासून पहाटे ३ वाजेपर्यंत सुरू राहणार असून, गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठानचे कार्यकर्ते, शिवप्रेमी व स्वयंसेवक यामध्ये सहभागी होणार आहेत.
नववर्षाचे स्वागत दारू-धिंगाण्यात न करता इतिहासाची जपणूक करत, स्वराज्याच्या विचारांशी निष्ठा राखून करण्याचे आवाहन प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी ८३७९०१२३४७ / ९९२०९०५९२०, ७६६६७०८२०१ या क्रमांकांवर संपर्क साधावा.




