
रत्नागिरी उपकेंद्रात मोफत उपलब्ध स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचा लाभ घेण्याचे आवाहन
रत्नागिरी : मुंबई उच्च न्यायालयाअंतर्गत लिपिक पदावरील भरतीच्या अनुषंगाने मुंबई विद्यापीठ संचलित रत्नागिरी उपकेंद्रात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा मोफत उपलब्ध असून, त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
मुंबई उच्च न्यायालयाअंतर्गत लिपिक पदावरील भरतीची जाहिरात प्रसारित झाली असून सार्वजनिक सेवेत जास्तीत जास्त संख्येने उमेदवार निवडले जावेत या उद्देशाने निर्मित रत्नागिरी उपपरिसर, मुंबई विद्यापीठ या कार्यालयातील स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रात दिवसाच्या पूर्ण वेळेत खुला असलेला वाचन कक्ष, उमेदवारांच्या मागणीनुसार प्रचलित पुस्तकांची खरेदी, इंटरनेट, परीक्षेचे मार्गदर्शनपर चित्रफिती पाहण्यासाठी दूरचित्रवाणी संच, मागणीनुसार प्रत्येक विषयाचे मार्गदर्शन आदी सुविधा विनामूल्य उपलब्ध आहेत.
या सुविधांचा लाभ घेण्यासाठी नोंदणी करणे आवश्यक आहे. लिपिक पदासाठी प्रयत्न करणाऱ्या उमेदवारांना नोंदणी करावी आणि त्यासाठी एमआयडीसी, मिरजोळे, रत्नागिरी येथील कार्यालयाच्या पत्त्यावर कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.




