
रनपच्या 32 नगरसेवकांमध्ये सौरभ मलुष्टे ठरले सर्वाधिक मताधिक्य घेणारे उमेदवार
ना. उदय सामंत, आ. किरण सामंत यांचे आशीर्वाद आणि निवडणूकपूर्व केलेल्या कामाची पोचपावती
राजू तोडणकर दुसऱ्या तर समीर तिवरेकर तिसऱ्या क्रमांकावर
रत्नागिरी
रत्नागिरी नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. निकालात 32 पैकी 29 जागा जिंकत महायुतीने रेकॉर्डब्रेक विजय संपादन केला. शिवसेना आणि भाजपचे तब्बल 29 नगरसेवक निवडून आल्यानंतर शहरात एकच जल्लोष करण्यात आला. निवडून आलेल्या 29 नगरसेवकांमध्ये सर्वाधिक मताधिक्य घेण्याचा बहुमान प्रभाग क्रमांक पाच मधील उद्योजक सौरभ मलुष्टे यांना मिळाला आहे. त्यांनी प्रतिस्पर्धी उमेदवाराचा तब्बल 1 हजार 336 इतक्या मोठ्या मतांनी पराभव करत विजय संपादन केला. ना. उदय सामंत आणि आ. किरण सामंत यांच्या पाठिंब्यामुळे हा विजय सहज शक्य झाल्याची प्रतिक्रिया नवनिर्वाचित नगरसेवक सौरभ मलुष्टे यांनी यावेळी दिली.
रत्नागिरी नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीची घोषणा करण्यात आली आणि सर्वच राजकीय पक्षांनी निवडणुकीसाठी कंबर कसली. शिवसेना आणि भाजप महायुती तर उबाठा, काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गट निवडणुकीच्या रिंगणात उतरले. राष्ट्रवादी अजित पवार गटाने ऐनवेळी स्वतंत्र निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला.
रविवार 21 डिसेंबर रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यात आला. अवघ्या एका तासात निकाल जाहीर झाला आणि महायुतीचे एक एक शिलेदारा विजयी मुद्रा घेऊन बाहेर पडले. मात्र महायुतीच्या निवडून आलेल्या शिलेदारांमध्ये सर्वाधिक मताधिक्याने निवडून येण्याचा मान मिळवला तो साळवी स्टॉप येथील प्रभाग क्रमांक पाच मधून उभे असलेले महायुतीचे उमेदवार सौरभ मलुष्टे यांनी. सौरभ मलुष्टे यांच्या समोर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रवीण नांदगावकर यांचे आव्हान होते. तसेच त्यांच्या सोबतीला उबाठा गटाचे शहर प्रमुख प्रशांत साळुंके यांच्या पत्नी प्रतिमा साळुंखे या देखील निवडणूक रिंगणात होत्या. मात्र निवडणूकपूर्व केलेल्या कामाची शिदोरी आणि ना. उदय सामंत आणि आ. किरण सामंत यांचे आशीर्वाद घेऊन मैदान उरलेल्या सौरभ मलुष्टे यांना मतदारसंघातून मतदारांचा भरभरून आशीर्वाद लाभला आणि ते शहरातून प्रथम क्रमांकाच्या मताधिक्याने विजयी झाले. त्यांच्या सहकारी पूजा पवार या देखील 1 हजार 61 इतकी मते घेऊन विजयी झाल्या. त्यांच्या पाठोपाठ भाजपचे राजेश तोडणकर 1 हजार 282 इतके मताधिक्य घेऊन तर तिसऱ्या क्रमांकावर भाजपचेच समीर तिवरेकर 1 हजार 276 मताधिक्य घेऊन विजयी झाले.




