
भाजपला घाम फोडला, नीलेश राणेंनी करून दाखवलं, मालवणमध्ये भगवा फडकला
संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या मालवण नगर परिषद निवडणुकीत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना पक्षाच्या ममता वराडकर यांनी विजयाचा गुलाल उधळला आहे.भाजप उमेदवाराचा त्यांनी जवळपास १०१९ मतांनी पराभव केला आहे. शिंदे सेनेचे आमदार नीलेश राणे यांचे सूक्ष्म नियोजन आणि रणनीतीपुढे भाजपचे आमदार, मंत्री नितेश राणे यांचा निभाव लागला नाही.
राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील २८८ नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम ४ नोव्हेंबर २०२५ रोजी जाहीर केला. त्यानुसार २ डिसेंबर २०२५ रोजी २६३ नगरपरिषदा आणि नगरपंचायतींसाठी मतदान झाले. उर्वरित ठिकाणी शनिवारी मतदान झाले. सर्व संबंधित ठिकाणी २१ डिसेंबरला सकाळी १० वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे.
मालवणमध्ये भगवा फडकला
मालवण नगरपरिषदेत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने जोरदार मुसंडी मारत नगराध्यक्षासह २० पैकी १० नगरसेवक निवडून आणले. त्यामुळे मालवण नगर परिषदेवर शिवसेनेचा भगवा डौलाने फडकला. मालवणमध्ये शिवसेना विरुद्ध भाजप अर्थात राणे बंधूंमध्ये संघर्ष पहायला मिळाला होता.मालवण नगर परिषद निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले होते. त्याचे प्रमुख कारण म्हणजे राणे बंधू यांच्यातील संघर्ष. आपल्याच पक्षाचा उमेदवार विजयी व्हावा याकरिता दोन्ही नितेश आणि नीलेश यांनी भरपूर प्रयत्न केले. नीलेश राणे यांनी तर भाजप उमेदवाराच्या घरात घुसून पैशाचे ‘स्टिंग ऑपरेशन’ करून राज्यात खळबळ माजवून दिली. अगदी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही मालवणच्या निवडणुकीची दखल घ्यावी लागली होती. राणे बंधूंमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या जोरदार फैरी झडत होत्या. मी विकासावर बोलतोय, परंतु भाजपने पैशांचा महापूर आणलाय, असे म्हणून नीलेश राणे थेटपणे नितेश राणे यांच्यावर तोफ डागत होते. नीलेश राणे यांना प्रत्यक्ष एकनाथ शिंदे यांची साथ लाभली. शिंदे यांनी नीलेश राणेंना भरपूर ताकद दिली होती. त्याचमुळे नगर परिषद निवडणुकीत आपला उमेदवार जिंकणारच, असा आत्मविश्वास नीलेश राणे उघडपणे बोलून दाखवत होते.




