
रत्नागिरीत वावरणाऱ्या बिबट्याबाबत उपाययोजना करण्यासंदर्भात शासकीय यंत्रणेची बैठक
रत्नागिरी : शहरात वावरणाऱ्या बिबट्याबाबत उपाययोजना करण्यासाठी आज (२० डिसेंबर) दुपारी १२ वाजता सर्व शासकीय यंत्रणेसह नागरिकांबरोबर पालकमंत्री उदय सामंत यांनी एमआयडीसी विश्रामगृह बैठक घेतली.
या बैठकीत जिल्हाधिकारी मनुज जिंदल, जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, विभागीय वन अधिकारी गिरीजा देसाई, सहाय्यक वनसंरक्षक प्रियंका लगड व वन कर्मचारी उपस्थित होते.
पालकमंत्री सामंत यांनी उपस्थित नागरिक आणि अधिकारी यांच्याकडून रत्नागिरी शहरात फिरत असलेल्या बिबट्याबाबत माहिती घेतली. बिबट्यास प्रत्यक्ष पाहिल्याची खात्रीलायक माहिती यावेळी मिळाली नाही. मात्र समाज माध्यमांवर प्रसिद्ध केलेल्या बिबट्याच्या व्हिडीओसंदर्भात वनविभागाकडून चौकशी करून घेण्याचे निर्देश यावेळी पालकमंत्री यांनी दिले. तसेच बिबट्याच्याबाबतीत वनविभाग किंवा प्रशासनाकडून खात्री केल्याशिवाय व्हिडीओ, फोटो प्रसिद्ध करू नयेत. त्याचचप्रमाणे वन विभागाने रात्री गस्त घालून वन्यजीव संरक्षण करावेत, ट्रॅप कॅमेरे लावण्याबाबतही त्यांनी सूचना बैठकीत दिल्या आहेत.
नागरिकांनी वन्यजीवसंदर्भात कोणत्याही चुकीच्या व्हिडीओ, बातमीवर विश्वास ठेवू नये. तसेच कोणताही वन्यजीव दिसून आल्यास वन विभागाचा टोल फ्री क्रमांक १९२६ किंवा ९४२१७४१३३५ आणि ९४२१२६२६६१ या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन विभागीय वन अधिकारी गिरीजा देसाई यांनी केले आहे.




