
प्रामाणिकपणाचा आदर्श ठरला गोदूताई जांभेकर विद्यालयाचा मानस जोशी

रत्नागिरी : शहरातील सौ. गोदुताई जांभेकर विद्यालयात इयत्ता सहावीतील विद्यार्थी मानस महेश जोशी (कोळंबे) याने आपल्या प्रामाणिक वर्तनाने समाजासमोर एक आदर्श निर्माण केला आहे. बस प्रवासादरम्यान मानसला पाचशे रुपये पास असलेले पाकीट सापडले. हे पैसे स्वतःकडे न ठेवता, त्यांने आई-बाबांच्या मदतीने शोध घेऊन ते पटवर्धन हायस्कूलमध्ये शिक्षण घेत असणाऱ्या स्वराज फुटक या विद्यार्थ्याचे असल्याचे लक्षात येताच, मानसने ते पैसे प्रामाणिकपणे शाळेत येऊन परत केले.
मानसच्या या स्तुत्य कृतीचे शिक्षक, पालक तसेच विद्यार्थ्यांनी कौतुक केले आहे. लहान वयात दाखविलेला हा प्रामाणिकपणा, जबाबदारीची जाणीव व नैतिक मूल्यांचे उत्तम उदाहरण ठरत आहे. अशा घटनांमुळे विद्यार्थ्यांमध्ये सद्वर्तन, विश्वास आणि सामाजिक बांधिलकीची भावना बळकट होते, असे मत शिक्षकांनी व्यक्त केले.
पटवर्धन हायस्कूलच्या मुख्याध्यापका श्रीमती जानकी घाटविलकर यांनी विद्यार्थ्यांचे पालक व विद्यार्थ्यांचे कौतुक केले. मानस जोशी याच्या या कृतीमुळे पटवर्धन हायस्कूलचे शिक्षक मुख्याध्यापक यांनी हार्दिक अभिनंदन केले आहे.




