
शिलाई मशिनमध्ये फसवणूक झालेल्या महिलांना शिलाई मशीन किंवा पैसे देण्याचे आश्वासन
चिपळूण सरकारी योजनेतून शिलाई मशीन देतो असे सांगून तालुक्यातील शेकडो महिलांकडून काही रक्कम घेतल्यानंतरही त्या बदल्यात मशीन न देता महिलांची आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार सोमवारी उघडकीस आला होता. याप्रकरणी पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलेल्या सुभाष सकपाळ याने येत्या दोन दिवसात शिलाई मशीन किंवा पैसे देण्याचे आश्वासन महिलांना दिले.
चिपळुणातील महिलांना सरकारी योजनेखाली शिलाई मशीन देतो, असे सांगून त्यासाठी ६०० ते १७०० रुपयांप्रमाणे एकूण ४२४ महिलांकडून तब्बल ३ लाख ६५ हजार ९७० रुपये सुभाष सकपाळ याने घेतले. त्यानंतर पुढील २० ते २५ दिवसांत मशीन देतो असेही त्याने त्या महिलांना सांगितले होते.
मात्र काही महिने उलटून गेल्यावर कोणत्याही स्वरुपात सरकारी योजनेतून शिलाई मशीन देण्यात आलेले नाही. याप्रकरणी महिलांनी सकपाळ याला विचारणा केल्यानंतर त्याच्याकडून उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिला संतप्त झाल्या. त्यांनी मुंबई-गोवा शिवाजी नगर महामार्गावरील बसस्थानक परिसरात असलेल्या एका खासगी कार्यालयावर धडक देत सकपाळ याला धारेवर धरले. घटनास्थळी पोलीस दाखल झाल्यानंतर त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. याप्रकरणी मनीषा संतोष खेडेकर यांनी याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला आहे. त्यावर श्रेया पाटेकर, कदम, स्वरा घारे, रिया देवळेकर यांनी देखील सह्या केल्या आहेत.www.konkantoday.com




