
गुहागर ग्रामीण रुग्णालयात डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे नवजात बालकाचा मृत्यू
गुहागर : ग्रामीण रुग्णालयात प्रसुतीसाठी दाखल करण्यात आलेल्या महिलेवर डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे आपले बाळ गमवायची वेळ आली. या घटनेमुळे संतप्त झालेल्या रुग्णाच्या नातेवाईकांनी ग्रामीण रुग्णालयात गर्दी करत वैद्यकीय अधिकाऱ्यांना जाब विचारला. तसेच त्यांच्या विरोधात गुहागर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सौ. तेजस्वी मुकेश शिंदे (वय २६, रा. वरवेली शिंदेवाडी, गुहागर) यांना आज (१६ डिसेंबर) पहाटे ५.३० वाजता गुहागर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले होते. या रुग्णाची रुग्णाची चिकित्सा डॉ. राहुल हजारे व त्यांचे सहकारी करत होते. तेजस्वी शिंदे यांच्यावर ५.३० वाजल्यापासून उपचार चालू करण्यात आले. परंतु सकाळी ८ वाजेपर्यंत कोणतीच सुधारणा न दिसल्यामुळे शिंदे यांच्या नातेवाईकांनी रुग्ण आमच्या ताब्यात द्या, आम्ही पुढे दुसऱ्या दवाखान्यात नेतो, अशी वारंवार विनंती केली; मात्र डॉ. हजारे यांनी ही बाब गांभीर्याने न घेता तेथेच उपचार करण्याचा प्रयत्न केला.
डॉ. हजारे यांच्या निष्काळजीपणामुळे तेजस्वी शिंदे यांना भयंकर त्रास जाणवू लागला. या दरम्यान नवजात बालकाला आपला जीव गमवावा लागला.
याप्रकरणी रुग्णाच्या संतप्त नातेवाईक आणि ग्रामस्थांनी रुग्णालयात हंगामा केला आणि थेट पोलीस ठाणे गाठले. डॉ. राहुल हजारे यांच्यावर निष्काळजीपणाचा ठपका ठेवत त्यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रात दाखल करण्यात आली आहे. दरम्यान, ग्रामीण रुग्णालय तसेच गुहागर पोलीस ठाण्यात नातेवाईक आणि ग्रामस्थांनी गर्दी केली होती.
या घटनेची सविस्तर चौकशी होऊन संबंधितांवर कठोरात कठोर कारवाई करावी, अशी मागणी संतप्त नातेवाईकांनी केली आहे.




