गुहागर समुद्रकिनार्‍याला आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पर्यटन पातळीवर नेण्यासाठी प्रयत्न सुरू


ब्ल्यू फ्लॅग मानांकन पायलट प्रकल्प म्हणून गुहागरसाठी मंजूर झाला आहे. महाराष्ट्रामध्ये सर्वात सुंदर समुद्रकिनारा म्हणून गुहागरची ओळख आहे. आपल्या सर्वांच्या सहकार्याने गुहागरला आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटन पातळीवर न्यायचे आहे, अशा भावना ब्ल्यू फ्लॅग मानांकन पायलट प्रकल्प सहाय्यक दीपक विचारे आणि नरेश पेडणेकर यांनी व्यक्त केल्या.
ब्ल्यू फ्लॅग मानांकन पायलट प्रकल्पाला अंतिम मानांकनासाठी गुहागर समुद्रकिनार्‍यावर विविध उपक्रम राबवण्यास सुरुवात झाली आहे. यातील वाळूशिल्प प्रदर्शन या उपक्रमाला यशस्वीपणे सुरुवात झाली. यावेळी मुख्याधिकारी स्वप्नील चव्हाण यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून तर दीपक विचारे, नरेश पेडणेकर यांच्या हस्ते फीत कापून वाळूशिल्प प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी विचारे, पेडणेकर यांनी वरील भावना व्यक्त केल्या.
मुख्याधिकारी स्वप्नील चव्हाण म्हणाले, समुद्रकिनार्‍यावर कोणीही प्लास्टिक अथवा कचरा टाकू नये. यावर कडक निर्बंध यापुढे लावले जाणार आहेत. व्यावसायिकांनी स्वतःबरोबर येणार्‍या सर्व पर्यटक व स्थानिक जनतेलाही कचरा उघड्यावर टाकू नये, याची सूचना करावयाची आहे. ब्ल्यू फ्लॅग मानांकनासाठी गुहागर हे सर्वोत्तम निवडीचे ठिकाण आहे. यामुळे या पर्यटनातून आपल्या सर्वांचा विकास होणार आहे. दर १५ दिवसांनी येथील समुद्राच्या पाण्याची तसेच हवेची प्रदूषण नियंत्रक मंडळाच्यावतीने तपासणी केली जात आहे. आपल्याला आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटन द्यावयाचे आहे, यासाठी हे एक संधी निर्माण झाली आहे यामुळे आपण सर्वांनी मिळून एकत्र येऊन हे ब्ल्यू फ्लॅग मानांकनाच्या पायलट प्रकल्पाला अंतिम मंजुरीपर्यंत नेण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन केले. यावेळी तहसीलदार परीक्षित पाटील, गटविकास अधिकारी शेखर भिलारे, ऍड. संकेत साळवी आदी मान्यवर उपस्थित होते.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button