विद्यार्थ्यांच्या करिअरच्या यशस्वी पूर्तीसाठी पालकांची सकारात्मक भूमिका महत्त्वाची : माधव अंकलगे.

रत्नागिरी : विद्यार्थी शिक्षण घेत असताना मोठ्या प्रमाणात यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करत असतो. त्यासाठी स्वप्ने पाहतो. याच स्वप्नांच्या पूर्तीसाठी प्रत्येक विद्यार्थी, उपलब्ध साधन सामुग्री आणि सुविधा यांच्या माध्यमातून करिअर निश्चित करत असतो. त्या करिअरच्या पूर्णत्वासाठी विद्यार्थ्यांच्या पालकांची भूमिका महत्त्वाची असते. त्यामुळे पालकांनी आपल्या पाल्यांच्या करिअरच्या बाबतीत सकारात्मक असणे आवश्यक असल्याचे मत व्याख्याते माधव अंकलगे यांनी व्यक्त केले.
एम. फांऊंडेशन ठाणे संचलित वामन गोविंद पटवर्धन हायस्कूल पोचरी (ता. संगमेश्वर) येथे विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित केले होते. त्याप्रसंगी ते बोलत होते.
श्री. अंकलगे पुढे म्हणाले, “आजच्या प्रगत प्रसारमाध्यमांच्या काळात आजच्या विद्यार्थ्यांची प्रचंड कोंडी झाली असून, त्यातून त्यांना आधार देऊन त्यांच्या आवडीच्या क्षेत्रांत झेप घेण्यासाठी आवश्यक मानसिक सहकार्य पालकांनी देणे अपेक्षित आहे. विद्यार्थ्यांच्या विकासात शाळेतील शिक्षक आपल्या परीने कार्य करत असतातच, मात्र त्यासोबतच पालकांची भूमिकादेखील महत्त्वाची आहे. त्यामुळे पालकांनी सतत सकारात्मक संवाद साधला पाहिजे. कारण आपले आई – वडील हे प्रत्येक विद्यार्थ्यांचे आदर्शवत असतात. त्यामुळे पालकांनी या वयात विद्यार्थ्यांना सहकार्य करावे आणि विद्यार्थ्यांनी देखील आपले शिकणे हे, आपल्यासाठी दिवसरात्र नि:स्वार्थी झटून स्वप्ने पाहणाऱ्या, पालकांसाठी समर्पित केले पाहिजे.”
एकदा संधी निघून गेल्यानंतर विचार करण्यापेक्षा वेळेत विचार करून त्यानुसार विद्यार्थ्यांनी वेळेचे नियोजन करणे आवश्यक असल्याचे मत मांडले.
यावेळी सर्वप्रथम शाळेचे मुख्याध्यापक श्री. पानगले यांनी प्रास्ताविक करताना शाळेच्या कार्याच्या आढावा घेतला. तसेच आपले भविष्यातील नियोजन कसे असेल याबाबत सविस्तर मार्गदर्शन करून ग्रामीण भागातील शाळा असूनही शाळेच्या विकासात्मक बाबीचा आढावा घेतला. संस्थेचे सचिव लोकेश सागवेकर यांच्या हस्ते व्याख्याते माधव अंकलगे यांचे स्वागत करण्यात आले.
यावेळी पोचरी ग्रामपंचायतच्या सरपंच भारती धामणे, शाळेचे मुख्याध्यापक श्री. पानगले यांच्यासह पालक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button