
गुहागर येथे भाजपा कार्यकर्त्यांची बैठक
जि.प., पं. स. निवडणूक जिंकण्याचा निर्धार

भारतीय जनता पार्टीची (भाजपा) गुहागर तालुका बैठक गुहागर येथे भाजपच्या कार्यालयात झाली. प्रारंभी दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
बैठकीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक लढवून जिंकण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी केला. यावेळी भाजपाचे जिल्हा अध्यक्ष सतीश मोरे यांनी श्रीफळ वाढवून जिल्हा परिषद, पंचायत समिती प्रचाराचा शुभारंभही केला. यावेळी कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष आणि उत्साह दिसत होता.
बैठकीत मार्गदर्शन करताना जिल्हाध्यक्ष सतीश मोरे म्हणाले, “गुहागर तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूक रिंगणात सर्व जागा आपण प्रामाणिकपणे लढवायच्या आहेत. युतीचा निर्णय काय करावा यासंदर्भात आपले वरिष्ठ नेते निश्चितच निर्णय घेतील. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, माजी आमदार डॉ. विनय नातू यांच्या मार्गदर्शनाखाली आपण जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका ताकतीने लढवायच्या आहेत. यासाठी आतापासूनच कार्यकर्त्यांनी सज्ज व्हा.”
नुकतीच गुहागर नगरपंचायत निवडणूक आपण यशस्वीपणे लढवली आहे, यामध्ये आपलाच विजय आहे यात कोणतीही शंका नाही. ज्याप्रमाणे नगरपंचायत निवडणूक आपण लढवली. त्याचप्रमाणे आपण जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक लढवू. त्यासाठी आपल्याला आत्ता पासूनच तयारी करावी लागणार असल्याचे मोरे यांनी स्पष्ट केले.
यावेळी भाजपचे गुहागर तालुकाध्यक्ष अभय भाटकर यांनी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीमध्ये सर्व कार्यकर्त्यांनी एक दिलाने काम करावे. निवडणूक नियोजन आणि कार्यकर्त्यांचा समन्वय एकच असला पाहिजे असे सांगितले.
यावेळी तालुका सरचिटणीस संतोष सांगळे, महिला आघाडी अध्यक्ष प्रांजली कचरेकर, भाजपच्या उत्तर रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस श्रीमती नम्रता निमूणकर, ओबीसी सेलचे अध्यक्ष मंगेश रांगले, संदीप साळवी, विजय भुवड यांच्यासह गुहागर तालुक्यातील जिल्हा परिषद गटातील आणि पंचायत समिती गणातील कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.




