
रत्नागिरीतील तरुणाने बनवले “आयएनएस विक्रांत”चे तब्बल ३७ फूट लांबीचे मॉडेल
रत्नागिरी : शिपमॉडेलिंग क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या रत्नागिरीतील मयूर वाडेकर या तरुणाने आपल्या सहकाऱ्यांच्या साथीने भारत-पाकिस्तान युद्धात महत्त्वाची भूमिका बजावलेल्या आयएनएस विक्रांत या एअरक्राफ्ट कॅरिअर युद्धनौकेचे तब्बल ३७ फूट लांबीचे मॉडेल रत्नागिरीत तयार केले आहे. विक्रांतची ही प्रतिकृती रत्नागिरीतून विशाखापट्टनममार्गे कोलकाता येथे रवाना करण्यात आली असून, हे मॉडेल कोलकाता शिपयार्डमध्ये ठेवण्यात येणार आहे.

शहराजवळील मिरजोळे पाटीलवाडी येथे मयूर वाडेकर याने एनसीसी विद्यार्थी व सहकाऱ्यांच्या मदतीने विक्रांतचे मॉडेल तयार केले आहे. याआधी त्याने आयएनएस कुकरी व अन्य भारतीय लढावू जहाजांचीही प्रतिकृती तयार केली आहेत. यापूर्वी त्याने तयार केलेल्या प्रतिकृती या विशाखापट्टनम, गोवा, कोलकाता, दिल्ली याठिकाणी रक्षा मंत्रालय व नौसेनेच्या कार्यालयात ठेवण्यात आली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबईतील दौऱ्यादरम्यानही त्याने तयार केलेल्या प्रतिकृती ठेवण्यात आल्या होत्या.
मागील एक महिन्यापासून विक्रांतची प्रतिकृती तयार करण्याचे काम रत्नागिरीत सुरू होते. भारतातील ही सर्वात मोठी प्रतिकृती असणार असून या पूर्वी १२ फुटाच्या प्रतिकृती तयार करण्यात आल्या आहेत. यासाठी जवळपास १४ लाखांचा खर्च आला आहे.
मयुर वाडेकर याच्यासह नीलेश मेस्त्री, महेंद्र कोलगे, दीपक मेस्त्री, दानियल सारंग, निहारीका राऊत, फहद लाला, अर्ष फणसोपकर, निखिल गावकर, संपदा हर्डीकर यांच्यासह एनसीसीच्या विद्यार्थ्यांनी सहकार्य केले. यासाठी १४ जणांच्या टीमने दिवस-रात्र काम करून २२ दिवसांत हे मॉडेल तयार केले आहे.
“आपल्या एनसीसीमध्ये खूप चांगले चांगले शिप मॉडेलर होतात, स्पर्धेतही चांगली कामगिरी करतात. पण पुढे मार्गदर्शनाअभावी त्यांना वाटते की इथेच करिअर संपले, पण शिप मोल्डिंग हे असे क्षेत्र आहे की यात पुढे खूप चांगले भावितव्य आहे, फक्त करण्याची तयारी पाहिजे,” असे मयूर वाडेकर यांनी सांगितले.




