वैभववाडी – कोल्हापूर रेल्वेमार्ग राज्य शासन उभारणार;भूसंपादनाचे आदेश


पालकमंत्री नितेश राणेंची विधिमंडळात पत्रकार परिषदेत माहिती


नागपूर : अवघे कोकण ज्या क्षणाची वाट पाहत होते, तो सोनेरी दिवस अखेर उजाडला आहे. बहुप्रतिक्षित वैभववाडी ते कोल्हापूर रेल्वेमार्ग महाराष्ट्र सरकारमार्फत उभारण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. मत्सव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी गुरुवारी या निर्णयाबाबत विधानसभेत निवेदनाद्वारे माहिती दिली. रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खासदार नारायण राणे यांनी या रेल्वे मार्गाबाबत केंद्र आणि राज्य सरकारकडे सातत्यपूर्ण पाठपुरावा केला होता.
या निर्णयाबद्दल नागपूर विधान भवनात माध्यमांशी संवाद साधतना मंत्री नितेश राणे म्हणाले, वैभववाडी ते कोल्हापूर असा रेल्वे मार्ग राज्य शासनामार्फत करण्याचा निर्णय आणि त्यासंबंधीत कारवाई करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. हा निर्णय केवळ कोकणासाठी नव्हे, तर महाराष्ट्रासाठी गेमचेंजर ठरणार आहे. या रेल्वे मार्गामुळे विकासाची असंख्य दालने उघडणार आहेत. प्रामुख्याने कृषी आणि मत्स्य उत्पादनांच्या वाहतुकीला चालना मिळेल. पर्यटनात वाढ, पूर आणि भुस्खलनाच्या काळात दळणवळणाची पर्यायी सुविधा म्हणून हा मार्ग उपयुक्त ठरेल. याची भूसंपादनाची प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिल्याची माहिती राणे यांनी दिली.

खा. नारायण राणे यांच्या प्रयत्नांना यश – मंत्री नितेश राणे

  • मंत्री नितेश राणे म्हणाले, या एका निर्णयामुळे महाराष्ट्र आणि कोकण आर्थिक विकासाच्या दिशेने अतिशय गतिमान पद्धतीने वाटचाल करेल. या रेल्वेमार्गासाठी रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे खासदार नारायण राणे यांनी सातत्याने राज्य आणि केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला होता. त्यांचे यात मार्गदर्शन लाभले. आमदार निलेश राणे यांनीही याबाबत पाठपुरावा केला होता.
  • या एका निर्णयामुळे रोजगाराच्या मोठ्या संधी सिंधुदुर्ग जिल्ह्यात तयार होतील. मनिऑर्डर संस्कृती कोकणात वर्षानुवर्षे सुरू होती, कोकणातील तरुण नोकरी आणि व्यवसायासाठी मुंबई, पुण्याकडे जायचे, ते या निर्णयामुळे रोजगाराच्या दृष्टीकोनातून गावाकडे परत येण्याचा विचार सुरू करतील, असा माझा ठाम विश्वास आहे, असे नितेश राणे म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या या निर्णयाचा मी बंदरे विकास मंत्री आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मनापासून स्वागत करतो, असे त्यांनी सांगितले.
    टाईमबाऊंड पद्धतीने प्रकल्प पूर्ण करण्याचा मानस
  • मंत्री नितेश राणे यांनी सांगितले की, टाईमबाऊंड पद्धतीने हा रेल्वेमार्ग पूर्ण करण्याचा आमचा मानस आहे. जेणेकरून रोजगार, पर्यटन आणि उद्योगवृद्धी जलदगतीने होऊ शकेल. कोकणातील आंबा, काजू, मत्स्य उत्पादने, दुग्धजन्य पदार्थांची आयात-निर्यात सोपी होईल. जयगड, रेडी बंदराशी कनेक्टीव्हीटी मिळणार असल्याने विकासाचे मार्ग खुले होतील. दरडोई उत्पन्नात वाढ होईल.
  • आज सिंधुदुर्ग जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न अडीच लाख रुपये आहे, ते साडेचार ते पाच लाखापर्यंत नेण्याचा आमचा मानस आहे. त्यासाठी हा प्रकल्प अतिशय महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेला हा निर्णय आणि आजचा दिवस कोकणच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिला जाईल. खासदार नारायण राणे, आमदार निलेश राणे यांच्यासह आम्ही यासाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा केला होता. मुख्यमंत्री फडणवीस यांनी आमची मागणी आज पूर्ण केली, असे नितेश राणे यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button