
आता ५०० रुपयांच्या स्टॅम्पवर वडिलोपार्जित जमिनीची वाटणी; महसूल विभागाची घोषणा
वडिलोपार्जित जमीन, जागांची मुला-मुलींच्या नावे वाटणी आता अवघा ५०० रुपयांच्या स्टॅम्पवर होणार आहे. त्यासंदर्भातील शासन निर्णय अजून निघालेला नाही, पण महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी तशी घोषणा केली आहे.यामुळे पाच ते ३० हजार रुपयांपर्यंत बचत होणार आहे.
महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ मधील कलम ८५ नुसार संयुक्त धारणेतील जमिनीत एकापेक्षा जास्त सहधारक असतील तर त्यांना त्यांच्या वाटणीच्या हिश्श्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज करता येतो. मात्र, मालकी हक्काबाबत वाद असल्यास दिवाणी न्यायालयाचा निकाल येईपर्यंत वाटणी थांबते. आदेशानंतर वाटणीची कार्यवाही तहसीलदारांमार्फतही केली जाते. त्यासाठी एक रुपयाचे देखील शुल्क लागत नाही.
याशिवाय संमतीने वडील त्यांच्या मुलांना जमीन, जागेची वाटणी देत असतील तर सध्या त्यासाठी एक-दोन टक्के स्टॅम्प ड्यूटी, नोंदणी शुल्क व २०० ते ५०० रुपयांचा स्टॅम्प पेपर लागतो. पण, महसूल विभागाच्या प्रस्तावित निर्णयानंतर कोणतेही शुल्क न भरता अवघ्या ५०० रुपयांत वडिलोपार्जित जमिनीचे हिस्से मुलांच्या नावे करता येणार आहेत. सर्वांची संमती आणि वाटप होणारे क्षेत्र निश्चित केलेला स्टॅम्प दुय्यम निबंधक कार्यालयात दिल्यावर त्याठिकाणी संबंधित मुलांच्या नावे तेवढे क्षेत्र होईल, अशी कार्यपद्धती असणार आहे.
शासन निर्णय अजून नाही, निर्णयानंतर होईल कार्यवाही
सध्या वडिलोपार्जित किंवा वडिलांच्या नावावरील जमीन मुलांच्या नावे करण्यासाठी वाटणीपत्र केले जाते. त्यासाठी एक टक्के नोंदणी फी व ५०० रुपयांचा स्टॅम्प लागतो. जागेसाठी मात्र दोन टक्के स्टॅम्प ड्यूटी व एक टक्का नोंदणी फी द्यावी लागते. आता यात बदल होणार आहे, पण त्यासंदर्भातील शासन निर्णय निघालेला नाही. शासन निर्णयानंतर त्यानुसार कार्यवाही केली जाईल.




