
शिष्यवृत्ती परीक्षा २०२६; इयत्ता ५वी-८वी अर्ज भरण्यास १५ डिसेंबरपर्यंत मोठी मुदतवाढ!
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत २२ फेब्रुवारी २०२६ रोजी होणाऱ्या इयत्ता पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी नियमित शुल्कासह अर्ज भरण्यास येत्या सोमवारपर्यंत (ता.१५) मुदतवाढ देण्यात आली आहे. या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी शाळांना शाळा नोंदणी आणि नियमित शुल्कासह विद्यार्थी नोंदणीसाठी ही अंतिम मुदतवाढ आहे.परीक्षेसाठी शाळा नोंदणी आणि विद्यार्थ्यांचे अर्ज ‘https://www.mscepune.in’ आणि ‘https://puppssmsce.in’ या संकेतस्थळावर भरायचे आहेत. शिष्यवृत्ती परीक्षेसाठी विलंब शुल्कासह १६ ते २३ डिसेंबर, अतिविलंब शुल्कासह २४ ते २७ डिसेंबरपर्यंत तसेच अतिविशेष विलंब शुल्कासह २८ ते ३१ डिसेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहे. मात्र, ३१ डिसेंबरनंतर कोणत्याही परिस्थितीत विद्यार्थ्यांना ऑनलाइन अथवा ऑफलाईन अर्ज भरता येणार नाही, असे परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी स्पष्ट केले आहे.




