
रवींद्र चव्हाण माझ्या मोठ्या भावासारखे -आमदार निलेश राणे*
मालवणमधील नगरपरिषदेच्या निवडणुकीदरम्यान गेल्याच आठवडयात शिवसेना शिंदे गटाचे आमदार निलेश राणे व भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यातील वाद चांगलाच रंगला होता.या वादातूनच निलेश राणे यांनी बंधू नितेश राणे यांच्यावर टीका केली होती. त्यामुळे निवडणूक काळातच वातावरण चांगलेच तापले होते. तर दुसरीकडे निलेश राणे आणि रवींद्र चव्हाण यांच्यामुळे महायुतीमध्ये तणाव निर्माणही झाला होता. मात्र, निवडणुका संपताच हा दोघांतील वादावर पडदा पडला असून नागपुरात विधानभवन परिसरात सोमवारी निलेश राणे-रवींद्र चव्हाण समोरा-समोर आलेसोमवारी दुपारी नागपूरमधील हिवाळी अधिवेशनावेळी निवडणुकीत भाजपवर तुटून पडणारे निलेश राणेंसमोर रवींद्र चव्हाण आले अन् दोघांनी यावेळी विधीमंडळ परिसरात हसतखेळत भेट घेतली. यावेळी दोघांमध्ये गळाभेटही झाली. या भेटीनंतर माझे आणि रवींद्र चव्हाण यांचे काहीही वितुष्ट नाही. जे काही होते ते निवडणुकीपुरते होते, अशी प्रतिक्रिया निलेश राणे यांनी प्रसार माध्यमाशी बोलताना दिली. यावेळी रवींद्र चव्हाण माझ्या मोठ्या भावासारखे आहेत, असेही निलेश राणे यांनी सांगितले.




