
भीमा तुझं प्रणाम कोटी कोटी! रत्नागिरीत हजारोंचा जनसागर; महामानवाला मध्यरात्री पोलिस अधीक्षक IPS नितीन बगाटे यांचे अभिवादन

रत्नागिरी/
आधुनिक भारताचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त रत्नागिरी तालुक्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या हजारो अनुयायांच्या श्रद्धेचा महासागर ५ डिसेंबर रोजीच्या मध्यरात्री शासकीय रुग्णालय येथील पुतळा परिसरात दाटून आला. दहा वाजल्यापासून ते मध्यरात्रीपर्यंत सुरू असलेल्या या अभिवादन सोहळ्याने प्रत्येक कोपरा ‘जय भिम’ या अनुनादाने भरून गेला.
विशेष म्हणजे रात्री बारा वाजताच रत्नागिरीचे पोलिस अधीक्षक IPS नितीन बगाटे पुतळ्याजवळ अत्यंत शांत, विनयशील आणि सौम्य उपस्थितीत दाखल झाले. ते दाखल होताच उपस्थित अनुयायांनी स्वतःहून रस्ता मोकळा करून देत त्यांचे स्वागत केले. बगाटे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत सलामी देत अभिवादन केले आणि त्या क्षणी परिसरात एक आगळी–वेगळी श्रद्धागंभीर शांतता पसरली. जिल्ह्यात जिल्हा पोलीस अधीक्षक पदी रुजू झाल्यापासून IPS नितीन बगाटे यांनी दाखवलेली कर्तव्यनिष्ठा, संवेदनशीलता आणि लोकाभिमुख प्रशासनाची शैली लोकांच्या मनात खोलवर घर करून आहे. असे अधिकारीच जनतेच्या आदरास पात्र ठरतात, अशी भावना उपस्थित आंबेडकरी-बौद्ध बांधव व्यक्त करत होते.
समता सैनिक दलाच्या तुकडीने संचलन करत पुतळ्याला शिस्तीची आणि समतेची सलामी दिली. समाजातील अनुशासन, समता आणि धम्माच्या मूल्यांचे प्रतिनिधित्व करणारी ही उपस्थिती कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरली. यासोबत कायद्याच्या रक्षणासाठी दिवस-रात्र कार्यरत असणारे जिल्ह्याचे सर्वोच्च पोलिस अधिकारी संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेबांना स्वतः येऊन मध्यरात्री अभिवादन करतात, हे दृश्य अनेकांच्या डोळ्यात पाणी आणणारे होते. यावेळी त्यांच्यासोबत अप्पर पोलिस अधीक्षक महामुनी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी माईंनकर, शहर पोलिस निरीक्षक विवेक पाटील यांनीही उपस्थित राहून अभिवादन केले.
गावोगावी, वाड्यावाडींतून आलेल्या तान्हुल्यांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्व वयोगटांतील अनुयायांची रात्री बारा वाजण्याच्या सुमारास रांग लागण्यास सुरुवात झाली होती. समता सैनिक दलाच्या नेतृत्त्वाखालील शिस्तबद्ध रांगांमुळे दर्शनाची व्यवस्था अत्यंत सुरळीत पार पडली. रात्री बारा वाजता समता सैनिक दलाने पुतळ्यास पुष्पचक्र अर्पण करून पंचशील ग्रहण केले. धार्मिक संस्थांनी आणि विविध संघटनांनी पुतळ्याला भावपूर्ण अभिवादन करीत वातावरण समतेच्या, धम्माच्या आणि बंधुभावाच्या प्रकाशाने उजळून निघाले.
पोलिसांच्या कसोशीचा बंदोबस्त
वाहतूक आणि शिस्त नियंत्रणासाठी शहर पोलिस निरीक्षक विवेक पाटील यांनी संपूर्ण बंदोबस्ताची काटेकोर आखणी केली. यावेळी पोलिस निरीक्षक विवेक पाटील हे स्वतः ठाण मांडून बसलेले पाहायला मिळाले. हजारो अनुयायांची गर्दी असूनही कोणताही अनुचित प्रकार न घडता कार्यक्रम शांततेत पार पडला. पोलिसांकडून मिळालेल्या या सहकार्यामुळे आणि समता सैनिक दलाच्या सैनिकांच्या सुयोग्य समन्वयामुळे धम्म बांधवांना दर्शन सुकर झाले.




