
संगमेश्वर नारडूवे येथे रानगव्यांमध्ये झालेल्या भीषण झुंजीत एका मादी रानगव्याचा मृत्यू
संगमेश्वर तालुक्यातील नारडूवे परिसरात दोन रानगव्यांमध्ये झालेल्या भीषण झुंजीत एका मादी रानगव्याचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सकाळी समोर आली. सकाळी सातच्या सुमारास मृत रानगवा आढळल्याची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.
तेथे पाहणीदरम्यान मादी रानगव्याचा मागील उजवा पाय दुसऱ्या गव्याच्या शिंगात अडकून गंभीर जखमी झाल्याचे स्पष्ट झाले. आसपासच्या जमिनीवरही झुंजीच्या खुणा स्पष्ट दिसत होत्या, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
यानंतर पशुधन विकास अधिकारी कडवई यांनी मृत रानगव्याचे शवविच्छेदन केले. त्यानंतर जेसीबीच्या सहाय्याने खड्डा खोदून लाकडाच्या साहाय्याने दहन करून मृतदेहाची विल्हेवाट लावण्यात आली.




