
कराडजवळ वाठार गावच्या हद्दीत कोकणातून सहलीवरून परतणाऱ्या विद्यार्थ्यांच्या बसला अपघात,चार जणांची प्रकृती गंभीर
नाशिकहून कोकणात गेलेली विद्यार्थ्यांच्या सहलीची खासगी बस आज मंगळवारी पहाटे कोकणातून नाशिककडे निघाली होती त्यादरम्यान बस कराड तालुक्यातील वठार गावाजवळील महामार्गावरून जात असताना संबंधित बसचा अपघात झाला.
पुणे-बंगळुरू महामार्गावर साताऱ्यातील कराडजवळ वाठार गावच्या हद्दीत सहलीला जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या बसला अपघात झाला आहे. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची सहलीची बस 20 फूट खड्ड्यात कोसळल्याने काही विद्यार्थी जखमी झाले आहेत. त्यातील चार जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर येत आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, नाशिकच्या निफाड तालुक्यातील पिंपळगाव येथील लेट बी. पी. ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स, पिंपळगाव बसवंत या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची सहल कोकणात गेली होती. सहल संपल्यानंतर विद्यार्थ्यी बसने सोमवारी (01 डिसेंबर) रात्री उशिरा नाशिककडे रवाना झाले. मात्र आज (02 डिसेंबर) पहाटेच्या सुमारास कराड तालुक्यातील वाटार गावाच्या हद्दीत पोहोचताच चालकाचा रस्त्यावरील अंदाज चुकल्याने बस महामार्गावरून 20 फूट खोल खड्ड्यात कोसळून अपघात झाला. या बसमध्ये 40 ते 45 विद्यार्थी आणि शिक्षक होते. सुदैवाने मोठी दुर्घटना टळली असली तरी बसमधील अनेक विद्यार्थी जखमी झाले आहेत. त्यातील 25 जण किरकोळ जखमी आहेत. बस दरीत कोसळताच परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत तातडीने बचावकार्य सुरू केले.
मिळालेल्या माहितीनुसार, सदर अपघातात पंधराहून अधिक विद्यार्थी किरकोळ जखमी झाले असून पाच विद्यार्थी गंभीर जखमी असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. सर्व जखमींना तत्काळ कराड येथील कृष्णा रुग्णालयात हलवण्यात आले आहे.




