
पुण्यातील हिंजवडीत खासगी बसने 5 मुलांना चिरडलं, सख्ख्या बहीण-भावाचा मृत्यू
पुणे शहरातून आताच्या घडीची मोठी बातमी समोर येत आहे. पुण्याच्या हिंजवडी येथे खासगी बसने 5 शाळकरी मुलांना चिरडलं आहे. यापैकी दोघांचा मृत्यू झाला आहे. तर तीन मुलं गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं आहे. त्यांच्यावर सध्य उपचार सुरु आहेत. या घटनेत दोन सख्ख्या बहीण-भावाचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण शहरात हळहळ व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे पुण्यात सातत्याने अपघाताच्या घटना समोर येत आहेत.
पुण्याच्या हिंजवडी आयटी पार्क परिसरात वाहतूक कोंडी ही नित्यनियमाची आहे. तसेच इथे अपघाताच्या घटनांचे प्रमाण देखील वाढले आहेत. आजदेखील संध्याकाळच्या सुमारास अशाच प्रकारे एक अपघाताची घटना घडली आहे. या अपघाताची तीव्रता मोठी आहे. कारण या अपघातात एका खासगी बसने पाच शाळकरी मुलांना अक्षरश: चिरडलं आहे. यापैकी 2 शाळकरी मुलगा आणि मुलीचा मृत्यू झाला आहे. तर 3 मुलं जखमी आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित खासगी बस ही एका आयटी कंपनीच्या कर्मचाऱ्यांना घेऊन जाणारी होती. ही बस पंचरत्न येथे आल्यानंतर अचानक तिचा टायर फुटला. त्यामुळे ही बस अनियंत्रित झाली. त्यानंतर रस्त्याच्या कडेला लागून चालत जाणाऱ्या चार ते पाच जणांना चिरडत जावून पुढे ही बस थांबली. या दुर्दैवी घटनेत सख्या बहीण-भावाचा मृत्यू झाला आहे.
*




