
खेड-रत्नागिरी एसटी बसमध्ये सुट्ट्या पैशांच्या वादातून वाहकाला मारहाण
खेड-रत्नागिरी एसटी बसमध्ये सुट्टया पैशाच्या वादातून एसटी वाहकाला मारहाण करण्यात आली. ही घटना रविवारी सकाळी ११.४३ वाजण्याच्या सुमारास निवळी बावनदी येथे बसमध्ये घडली. सखाराम परमेश्वर बांगर (३४, रा. पाटोदा बीड, सध्या रा. भरणेनाका खेड रत्नागिरी) असे मारहाण करण्यात आलेल्या वाहकाचे नाव आहे. बांगर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार ग्रामीण पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला.
संकेत लक्ष्मण तांबे (२६, रा. वेळंब, ता. गुहागर) असे संशयिताचे नाव आहे. वाहक बांगर व एसटी चालक गणेश गाडेकर हे २३ नोव्हेंबर रोजी सकाळी एसटी (एमएच २० बीएल १९६०) ही खेड ते रत्नागिरी अशी घेऊन येत होते. सकाळी ११.३० वाजता निवळी बावनदी बसस्टॉप येथे संशयित आरोपी संकेत तांबे हा बसमध्ये चढला. यावेळी वाहक बांगर याने बावनदी ते रत्नागिरी या प्रवासाचे ४१ रुपयांचे तिकीट दिले. यावेळी तांबे याने ५० रुपयांची नोट वाहक बांगर यांना दिली.
सुट्टे पैसे देत असताना बांगर यांनी तांबे याच्याकडे १ रुपया दे, नाहीतर उतरताना सुट्टे पैसे देतो असे सांगितले. नाहीतर तिकीटाच्या मागे ९ रुपये लिहून देतो, डेपोमध्ये जाऊन घे असे बांगर यांनी संशयिताला सांगितले. यावेळी सुट्टे पैसे देण्यावरुन जोरदार वाद बांगर व संशयित तांबे यांच्यात झाला. वाद अधिक विकोपाला गेल्यानंतर तांबे यांने वाहक बांगर याला मारहाण केली.
www.konkantoday.com




