
लैंगिकता हा प्रश्न वैयक्तिक असण्यासाठी जागृती करणे आवश्यक : श्रीगौरी सावंत
रत्नागिरी : भविष्यात लैंगिकता हा प्रश्न वैयक्तिक असण्यासाठी जागृती करणे आवश्यक असून, यात साहित्याची भूमिका महत्त्वाची असल्याचेही मत सामाजिक कार्यकर्त्या श्रीगौरी सावंत यांनी रत्नागिरी जिल्हा साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून प्रदर्शित केले.
महाराष्ट्र शासनाचा मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ (मुंबई) आणि नवनिर्माण शिक्षण संस्था यांच्या वतीने नुकत्याच आयोजित केलेल्या जिल्हा साहित्य संमेलनात श्रीगौरी सावंत यांची प्रकट मुलाखत झाली. मुख्य कार्यक्रमाला जोडूनच झालेली मुलाखत संजय वैशंपायन आणि प्रा. अर्चना कांबळे यांनी घेतली. यावेळी श्रीगौरी सावंत यांनी स्वतःच्या ट्रान्सजेंडर होण्याचा इतिहास आणि संघर्ष उपस्थितांसमोर मांडला.
श्रीगौरी सावंत या मूळच्या रत्नागिरीतील असून, शहराजवळील सड्या मिऱ्या हे त्याचे गाव असल्याचे त्यांनी सांगितले. वडील पोलीस खात्यात नोकरीला असल्याने त्यांचे वास्तव्य ते मुंबईत असले तरी कोकणातही या कुटुंबाचे येणे जाणे होते, असे सांगत कोकणातील लहानपणीच्या आठवणी, गंमतीजंमती त्यांनी सांगितल्या.
गणेश ते श्रीगौरी हा प्रवास सोपा नव्हता, गेल्या २० वर्षांत अनेक संकटांवर मात करत, समाज व्यवस्थेच्या विरोधात जात तृतीयपंथींना समाजात सन्मानाचे स्थान मिळवून देण्यासाठी केलेला संघर्ष त्यांनी आपल्या शब्दांत मांडला आणि उपस्थितांच्या अंगावर काटा उभा राहिला.




