
मुरुड येथे अनधिकृतपणे वीजवाहिनी टाकल्याने ठेकेदारावर वनविभागाकडून गुन्हा दाखल.
दापोली तालुक्यातील मुरुड येथील राखीव वनक्षेत्रात रस्त्याच्या बाजूला महावितरण कंपनीने अनधिकृतपणे चर खोदून वीजवाहिनी टाकल्याचे याचे निदर्शनास आले आहे. याबाबत दापोली, वनविभागाने कारवाई करत संबंधित ठेकेदार श्रीकांत केशू चव्हाण याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
वनविभागाने दिलेल्या माहितीनुसार, १५ नोव्हेंबर रोजी ही घटना उघडकीस आली. वनविभागाच्या पथकाने घटनास्थळी पंचनामा करून ही वीजवाहिनी त्वरित वनक्षेत्रातून काढून टाकली व चर बुजवला. याप्रकरणी ठेकेदार चव्हाण याच्याविरोधात दापोली वनपाल यांनी गुन्हा दाखल केला. ही कारवाई दापोलीचे परिक्षत्र वन अधिकारी प्रकाश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दापोली वनपाल रामदास खोत, वनरक्षक कोंगळे, वनरक्षक खेर्डी व वनरक्षक ताडील यांच्या पथकाने केली. सरकारी वनातील कोणताही हस्तक्षेप हा गंभीर फौजदारी गुन्हा आहे. अशा कृत्यांसाठी मोठा दंड, शिक्षा तसेच मुद्देमाल व वाहने सरकारकडे जमा केली जातात. त्यामुळे राखीव वनात वृक्षतोड करू नये, अतिक्रमण करू नये, तसेच मुरुम किंवा मातीची चोरी करू नये असे आवाहन दापोली वनविभागाने केले आहे.
www.konkantoday.com



