
रत्नागिरी जिल्ह्यातील शाळा- महाविद्यालयांच्या शैक्षणिक सहलींसाठी परिवहन मंडळाच्या एसटी बसेसना मोठी पसंती
रत्नागिरी जिल्ह्यातील शाळा- महाविद्यालयांच्या शैक्षणिक सहलींसाठी परिवहन मंडळाच्या एसटी बसेसना मोठी पसंती मिळत आहे. सहलीसाठी रत्नागिरी विभागातून नोव्हेंबर महिन्यासाठी 200, डिसेंबर महिन्यासाठी आतापर्यंत 150 असे एकूण 350 एसटी बसेसचे बुकिंग हाऊसफुल्ल झाले असून, सहलींसाठी परिवहन मंडळाच्या बस सुसाट धावत आहेत.9 आगारातून दररोज 18 हून अधिक बसेस विविध मार्गावर धावत आहेत.नोव्हेंबर ते जानेवारी हे तीन महिने शाळा, महाविद्यालयांच्या सहलीचे महिने असतात. शैक्षणिक सहलीस प्रारंभ झालेले आहे. सुरक्षित व चांगला प्रवास होण्यासाठी शाळा, महाविद्यालयांची पहिली पसंती खासगी बसेसऐवजी लालपरीलाच आहे. कारण विशेषतहा सहलींसाठी सवलतीच्या दरात बस उपलब्ध करून दिल्या जात आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील विविध आगारात काही महिन्यापूर्वीच नवीन स्मार्ट बसेस आलेल्या आहेत. या बसेस तसेच विविध चांगल्या बसेस सहलीला दिल्या जात आहेत. सद्यस्थितीत रत्नागिरी विभागातून 18 बसेस सहलींसाठी विविध मार्गावर धावत आहेत. नोव्हेंबर महिन्यात 200 बसेस तर डिसेंबर महिन्यासाठी 150 बसेसचे बुकिंग झाले असून, आणखी शेवटच्या टप्प्यात, जानेवारीच्या महिन्यातही बसेसचे बुकिंग वाढण्याची शक्यता आहे.




