
कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत पावसाची शक्यता
कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत पावसाची शक्यता आहे. ढगाळ वातावरणामुळे तापमानात वाढ झाली. राज्यात गारठा पुढील दिवसात कमी होईल. 23 नोव्हेंबर रोजी ढगाळ वातावरण राहून हलक्या पावसाची शक्यता आहे. रायगड, ठाणे, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत ढगांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली. देशभरातील हवामानात लक्षणीय बदल होण्याची शक्यता आहे. हवामान तज्ञांच्या मते, एकाच वेळी तीन प्रमुख चक्राकार वारे सक्रिय झाले आहेत, ज्यामुळे अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस आणि जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरातून वादळ उठणार असून मोठा फटका काही राज्यांना बसेल.
दक्षिण भारतातील तामिळनाडू, केरळ आणि अंदमान-निकोबार बेटांवर पुढचे 3 ते 4 दिवस पाऊस पडू शकतो. तर पश्चिम आणि मध्य भारतात तापमानात घट होईल. पश्चिम मध्य प्रदेशात थंडीची लाट निर्माण होण्याची शक्यता आहे. तापमानात घट होण्याची आणि उत्तर भारतात हलके धुके पडण्याची शक्यता आहे. राज्यात मागील काही दिवसांपासून उत्तरेकडून थंड वारे येत होते. हेच नाही तर थंडीच्या लाटेचा इशाराही देण्यात आला.
आता अचानक वातावरणात बदल होताना दिसतोय. उत्तर भारतात तापमानात घट आणि हलके धुके पडण्याची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये 23 नोव्हेंबर रोजी निरभ्र आकाश राहून कोरडे वातावरण राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली. कमाल तापमान 30 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 15 अंश सेल्सिअस इतके राहण्याची शक्यता आहे. बीड, परभणी, हिंगोली, जालना, नांदेड या भागातही जवळपास अशीच स्थिती राहिल.
नोव्हेंबर महिन्याच्या सुरूवातीला राज्यात पाऊस पडत होता. पावसाच्या विश्रांतीनंतर गारठा सुरू झाला. त्यामध्येच आता परत एकदा राज्याच्या काही भागांमध्ये पावसाचे ढग बघायला मिळत आहेत. रायगड, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये पाऊस होण्याची शक्यता आहे. हवामानात सातत्याने बदल होताना दिसतोय.




