
खेडमध्ये १९ उमेदवारांची माघार
खेडमध्ये नगराध्यक्ष पदाची तिरंगी लढत : महायुतीविरुद्ध महाविकास आघाडीची थेट टक्कर
खेड : नगरपालिकेसाठी दाखल केलेले उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी १९ उमेदवारांनी आपली उमेदवारी मागे घेतल्याने अखेर ५० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात कायम राहिले आहेत.
यंदाच्या सार्वत्रिक निवडणुकीत नगरपालिकेसाठी एकूण ९० उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. यापैकी छाननीदरम्यान २१ अर्ज अवैध ठरल्यानंतर ६९ उमेदवार रिंगणात उरले होते. मात्र आज
१९ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. नगराध्यक्ष पदासाठीही अर्ज मागे घेण्याच्या प्रक्रियेमुळे मोठी उलथापालथ झाली असून सुरुवातीला एकूण आठ उमेदवारांनी नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज भरले होते. त्यापैकी तीन अर्ज छाननीत बाद झाले व पाच उमेदवार स्पर्धेत उरले होते. मात्र अंतिम क्षणी वैभवी वैभव खेडेकर आणि तेजल प्रेमळ चिखले यांनी आपले अर्ज मागे घेतल्याने आता केवळ तीन उमेदवार नगराध्यक्ष पदासाठी मैदानात उरले आहेत. यामध्ये शिवसेनेच्या माधवी राजेश बुटाला, शिवसेना (उबाठा) सपना ऋषिकेश कानडे आणि वंचित बहुजन आघाडीच्या सीमा नितीन जाधव या तीन महिला उमेदवारांमध्ये तिरंगी लढत रंगणार आहे.
खेड शहरात भाजप व शिवसेना यांच्या महायुतीने एकजूट दाखवत अधिकृतरीत्या एकत्र निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. यानंतर भाजपकडून आणि अपक्ष म्हणून अर्ज भरलेल्या काही उमेदवारांनीही पक्षनिष्ठेला प्राधान्य देत उमेदवारी अर्ज मागे घेतले. परिणामी ही लढत थेट महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी सरळसरळ होणार असल्याचे दिसून येत आहे.
नगराध्यक्ष पदाच्या स्पर्धेत जरी तीन उमेदवार मैदानात असले तरी मुख्य लढत माधवी बुटाला आणि सपना कानडे यांच्यातच रंगणार असल्याच्या चर्चा आहेत.




