श्रमिक जिवंत आहे तोपर्यंत मराठीला मरण नाही : डॉ. राजन गवस

रत्नागिरी जिल्हा साहित्य संमेलनाचे उद्घाटन करताना धनंजय कीर यांचे सुपुत्र डॉ. सुनीत कीर आणि मान्यवर

प्रास्ताविक करताना संमेलनाचे स्वागताध्यक्ष अभिजीत हेगशेट्ये

रत्नागिरी (चरित्रकार धनंजय कीर साहित्यनगरी) : “मराठी भाषा ज्ञानभाषा करायची असेल आणि वाचवायची असेल तर प्रत्येकाने आपली जबाबदारी उचलली पाहिजे. एक भाषा मरते तेव्हा एक संस्कृती मरते. अर्थात मराठीला काहीही होणार नाही, फक्त मारणाऱ्यांच्या काठीचे दांडे होऊ नका, असा सल्ला देतानाच मराठीला भाषा ज्ञानभाषा करायची असेल तर अनुवादकाला अनुदान देऊन प्रोत्साहन द्या. अनुवादकांनी दरवर्षी चांगले जागतिक कीर्तीचे ज्ञानग्रंथ मराठीत आणले, तर मराठी नक्की वाचेल. जोपर्यंत श्रमिक जिवंत आहे तोपर्यंत मराठीला मरण नाही,” असे प्रतिपादन रत्नागिरी जिल्हा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. राजन गवस यांनी केले.
राज्य शासनाचा मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ (मुंबई) यांच्या अनुदानातून आणि नवनिर्माण शिक्षण संस्थेतर्फे आयोजित केलेल्या जिल्हा साहित्य संमेलनाचे उद्घाटन आज धनंजय कीर यांचे सुपुत्र डॉ. सुनीत कीर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर उपस्थित आणा उद्बोधित करताना डॉ. गवस बोलत होते.
मराठी साहित्यातून कोकण वजा केला तर उरत काय, असा प्रश्न विचारत ते म्हणाले, “साने गुरुजी, लोकमान्य टिळक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कृष्णराव अर्जुन केळुस्कर, केशवसुत ते अगदी वसंत सावंत, बालकृष्ण प्रभुदेसाई, दिवाकर कांबळी, मधु मंगेश कर्णिक किती नाव घ्यावी, इतके कोकणाचे मराठी साहित्यावर ऋण आहे. कोकणाचे मराठी साहित्याचा इतिहास भरघोस केला आहे. साहित्याचा इतिहास काढला तर तो कोकणाचा इतिहास ठरतो, इतके या परिसराने दिले आहे.”
“मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला, पण त्यामुळे काय फरक पडणार आहे. मराठीची अवस्था आपण काय करून ठेवले आहे. दैनंदिन जीवनातूनही मराठी हद्दपार करण्याचा चंगच बांधला आहे. प्रत्येकजण मराठीला मारण्याचा प्रयत्न करत आहे. मुलांना सेमी किंवा इंग्रजी माध्यमात शिकवून हेच मराठी संपत चालली म्हणून गळे काढणार. मराठी साधे वाचताही येत नाही हे वास्तव आहे. वाचन नाही म्हणून सुसंस्कृतपणाची अपेक्षा तरी कशी करणार. आपण प्रत्येकजण मराठीला मारण्याचा प्रयत्न करतोय आपण मराठीचे मारेकरी आहोत हे आपण मान्य करायला हवे, असे सांगत,” अशी खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली.
“विकास”, “निष्ठा” या शब्दांचा दाखला देत “राजकारण्यांनी भाषेला बदनाम केल्याचे ते म्हणाले. आज मराठी शाळा बंद, प्रयोगशील शिक्षक आहेत पण अधिकारी भ्रष्ट. शिक्षणाचा उकिरडा केला आहे. शाळेत, महाविद्यालयात एक चांगला प्राचार्य, कुलगुरू ही नेमला जात नाही. काय वाईट अवस्था आहे. कसं मराठी वाढवायचं,” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
ते पुढे म्हणाले, आज विचार बदलण्याची गरज आहे. मी एकटा काय करू हा विचार करून चालणार नाही. लेखक हा समाजाचा, शोषिताचा आवाज असतो. सत्तेला मुजरा करणारा, दलाल नसतो. लेखक हे मिरवण्याचे पद नाही, तर ती एक जबाबदारी आहे. तुम्हाला सत्तेला प्रश्न विचारता आला पाहिजे. लेखक हा विरोधी पक्ष नेता असतो. व्यवस्था अंगावर घ्यायची ताकद लेखकात असली पाहिजे. एक चांगला लिहिणारा संपूर्ण व्यवस्था बदलू शकतो.”
मुलं मोबाईलमध्ये, तंत्रज्ञानात अडकली असतील तर त्यांना आपण जबाबदार आहोत. आज नोकरदारांच्या घरात डोकावले तर पुस्तक सापडणार नाही, हे अत्यंत विदारक चित्र आहे आणि त्याला आपण जबाबदार असल्याचे त्यांनी नमूद केले.
आज कोकणात पाहिले तर किनारपट्ट्या विकल्या गेल्या आहेत, झाडांची, डोंगरांची कत्तल केली आहे. जमिनी धनिकांच्या ताब्यात आहेत. काय राहिलं कोकणात? इथल्या स्थलांतराचा प्रश्न गंभीर आहे. लाच दिल्याशिवाय नोकऱ्या मिळत नाही, या गंभीर प्रश्नांकडेही डॉ. गवस यांनी उपस्थितांचे लक्ष वेधले.
यावेळी व्यासपीठावर महाराष्ट्र राज्य साहित्य सांस्कृती मंडळाचे उपाध्यक्ष डॉ. प्रदीप ढवळ, मंडळाचे सदय जयू भाटकर, संमेलनाचे स्वागताध्यक्ष अभिजीत हेगशेट्ये, साप्ताहिक साधनाचे संपादक विनोद शिरसाठ, युवा शास्त्रज्ञ डॉ. प्रतीक मुणगेकर, सामाजिक कार्यकर्त्या श्रीगौरी सावंत आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रास्ताविक करताना स्वागताध्यक्ष अभिजीत हेगशेट्ये यांनी रत्नागिरीतील साहित्यिकांचा आवाज आढावा घेतला. यानंतर जयू भाटकर, डॉ. सुनीत कीर, विनोद शिरसाठ, डॉ. प्रदीप ढवळ यांनी मनोगत व्यक्त केले.
संमेलनाची सुरुवात सकाळी पहाटे साडेसहा वाजता “उषःकाल” या सांगितिक मैफलीने झाली. त्यानंतर जे. के. फाईल्स ते नवनिर्माण महाविद्यालय अशी ग्रंथदिंडी काढण्यात आली. या दिंडीत शहरातील नवनिर्माण हायस्कूल पटवर्धन हायस्कूल देव-घैसास कीर कॉलेज, वाय. डी. पवार स्कूल, दामले विद्यालय, अविष्कार हायस्कूल, पावस हायस्कूल, गोगटे-जोगळेकर कॉलेज, एस. डी. नाईक, फाटक हायस्कूल, एस. पी. हेगशेट्ये कॉलेज आणि नवनिर्माण कॉलेज सहभागी झाले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button