
प्रोटेक्शन बोर्ड ऑफ इंडियाचे अधिकारी असल्याचे भासवून आंगवलीतील वृद्धाची २२ लाखाची फसवणूक
प्रोटेक्शन बोर्ड ऑफ इंडियाचे अधिकारी असल्याचे भासवून संगमेश्वर तालुक्यातील आंगवली येथील वृद्धाला फोनवरून धमकी देत तब्बल २२ लाख २० हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी अज्ञाताविरोधात देवरुख पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबतची फिर्याद जनार्दन काशिनाथ अणेराव (लोढा क्वालिटी होम माजीवडा ठाणे, मूळ गाव आंगवली, ता. संगमेश्वर) यांनी दिली. जनार्दन अणेराव यांना १५ रोजी सकाळी ९.३० ते १० या वेळेत ७२३१९०५९१५ या मोबाईल नंबरवरून फोन आला. आपण आर. के. चौधरी डेटा प्रोटेक्शन बोर्ड ऑफ इंडिया मुंबई येथून बोलत असल्याचे अणेराव यांना सांगितले. सीमकार्ड नंबर ९७५५६२८०९४ घेवून लोकांना पैशाच्या मागणीसाठी त्रास देतो, याबाबत आमच्याकडे तक्रारी दाखल झाल्या आहेत. तुम्हाला अटक करतो, असे अणेराव यांना सांगितल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. जॉर्ज मॅथ्यु यांनी ८४३२३९७५७९ या मोबाईल नंबरवरून अणेराव यांचे सर्व डिटेल घेतले. कायदेशीर कारवाईची भीती दाखवून २२ लाख २० हजाराची फसवणूक केल्याचे जनार्दन अणेराव यांनी फिर्यादीत नमूद केले आहे. हा प्रकार १५ ते १८ नोव्हेंबर या कालावधीत घडला. दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञाताविरोधात देवरुख पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक उदय झावरे करीत आहेत.
www.konkantoday.com




