भारतीय हवाई दलाच्या तेजस Mk-1 लढाऊ विमानाचा भीषण अपघात , दुर्घटनेत विंग कमांडर नमांश स्याल यांचा दुर्दैवी मृत्यू


दुबई एअरशो २०२५ दरम्यान भारतीय हवाई दलाच्या तेजस Mk-1 लढाऊ विमानाचा भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत विंग कमांडर नमांश स्याल (वय ३४) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. अपघाताची बातमी त्यांच्या वडिलांना थेट यूट्यूबवरून कळली, ही बाब विशेष दु:खदायक ठरली आहे
हिमाचल प्रदेशातील कांगडा जिल्ह्यातील पटियालकड गावचे रहिवासी आणि निवृत्त मुख्याध्यापक जगन्नाथ स्याल हे गुरुवारी संध्याकाळी साधारण चार वाजता यूट्यूबवर मुलाच्या एअरशो परफॉर्मन्सचे व्हिडिओ शोधत होतो. तेव्हाच त्यांना विमान कोसळल्याची बातमी दिसली. ते म्हणाले, “मी एअरशोचे व्हिडिओ पाहण्याच्या नादात होतो. अचानक अपघाताची बातमी आली. मी लगेच माझ्या सुनेचा, जी स्वतःही विंग कमांडर आहे, फोन केला. थोड्याच वेळात हवाई दलाचे सहा अधिकारी घरी आले आणि मला समजले की माझा मुलगा आता नाही.”
नमांश यांचे शेवटचे वडिलांशी बोलणे गुरुवारीच झाले होते. त्यावेळी त्यांनी वडिलांना सांगितले होते, “बाबा, टीव्ही किंवा यूट्यूबवर माझा परफॉर्मन्स नक्की पहा.” वडील तेच करत असतानाच त्यांना मुलाच्या मृत्यूची बातमी कळाली.

सध्या स्याल कुटुंब तामिळनाडूतील कोइम्बतूर येथे आहे. नमांशची पत्नी विंग कमांडर अमनदीप कौर सध्या कोलकात्याला प्रशिक्षणासाठी गेल्या असल्याने वडील-आई दोन आठवड्यांपूर्वी हिमाचलहून नात सात वर्षीय आर्या हिची काळजी घेण्यासाठी कोइम्बतूरला आले होते. अपघाताची बातमी कळताच नमांशच्या आई वीणा स्याल यांना प्रचंड धक्का बसला असून त्या बोलू शकत नाहीत.

व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. फुटेजमध्ये तेजस विमान अचानक उंची गमावताना, नंतर जमिनीवर आपटून आगीच्या प्रचंड गोळ्यात रूपांतरित होताना दिसते. अल मकतूम आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात प्रचंड काळा धूर पसरला होता. धावपट्टीजवळील प्रेक्षकांमध्ये प्रचंड घबराट पसरली.

भारतीय हवाई दलाने X वर जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे, “या अपघातात झालेल्या जीवितहानीमुळे भारतीय हवाई दलाला अत्यंत दु:ख झाले आहे. शोकाकुल कुटुंबाबरोबर हवाई दल खंबीरपणे उभा आहे. अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी चौकशी न्यायालय स्थापन करण्यात येत आहे.”

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button