
उद्धव ठाकरेंनी मनसेची साथ सोडावी आणि आमच्यासोबत यावं काँग्रेसची ऑफर
ठाकरे बंधूंमधील जवळीक वाढत असताना महाविकास आघाडीतील मनसेची एन्ट्री वेटिंगवर असून तिला काँग्रेसचा तीव्र विरोध आहे. याच मुद्द्यावरुन उद्धव ठाकरे हे मविआतून बाहेर पडण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जात आहे. याचदरम्यान,आता काँग्रेसनं उद्धव ठाकरेंना मोठी गुगली टाकल्याची माहिती समोर येत आहे.
काँग्रेसनं आता थेट माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना मोठी ऑफर दिली आहे. उद्धव ठाकरेंनी मनसेची साथ सोडावी आणि आमच्यासोबत यावं अशी ऑफर देत काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी मुंबईच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. मुंबई महापालिकेत काँग्रेसनं यापू्र्वीच स्वबळाची घोषणा केली आहे. तर उद्धव ठाकरेंनीही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीशी जुळवून घेण्यात थोडा हात आखाडता घेतला आहे..
पण आता काँग्रेसनं पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंना सोबत घेण्याची तयारी दर्शवली आहे. पण यावेळी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्याकडून ठाकरेंसमोर मोठी अट ठेवली आहे. मनसेची साथ सोडून जर उद्धव ठाकरे सोबत आले तर काँग्रेस स्वबळाचा पुनर्विचार करेल असं म्हटलं आहे. पण यावेळी उद्धव ठाकरेंनी मनसेची साथ सोडली तरी,काँग्रेसनं काही अटी अन् शर्ती असणार असल्याची माहिती समोर येत आहे.



