
गुहागर नगरपंचायतीमध्ये पहिला नगरसेवक बिनविरोध
गुहागर : नगरपंचायतींसाठी दाखल झालेले उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस होता. यात गुहागर नगरपंचायतीमध्ये पहिला नगरसेवक उमेदवार हा बिनविरोध निवडून आला आहे.
भारतीय जनता पार्टीच्या (भाजप) प्रभाग क्रमांक पाच मधून सिद्धी राजेश शेटे या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पुरस्कृत मनसे पक्षाकडून निवडणूक लढवत होत्या, तर भाजप आणि शिवसेनेकडून वैशाली संतोष मावळंकर या निवडणुकीसाठी उभ्या होत्या. या प्रभागात दोनच उमेदवार उभे असल्याने आज अर्ज मागे घेण्याची मुदत संपण्याच्या काही मिनिटे आधी सिद्धी शेटे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने वैशाली संतोष मावळंकर या भाजपच्या उमेदवार बिनविरोध निवडून आल्या आहेत.
त्यांची बिनविरोध निवड होताच युतीमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले असून ही विजयाची नांदी आहे, असे आता बोलले जात आहे. भाजप उमेदवार बिनविरोध निवडून आल्याची माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष सतीश मोरे आणि तालुकाध्यक्ष अभय भाटकर यांनी दिली.




