
संगमेश्वर तालुक्यातील कोंडीवरे येथे शेती संरक्षणासाठी लावलेल्या विद्युत तारेचा धक्का लागून दोन रानकुत्र्यांचा मृत्यू
संगमेश्वर तालुक्यातील कोंडीवरे येथे शेती संरक्षणासाठी लावलेल्या विद्युत तारेचा धक्का लागून दोन रानकुत्र्यांचा (कोळसुंदे) मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेनंतर पुरावा नष्ट करण्यासाठी मृत रानकुत्र्यांना जमिनीत पुरून टाकणाऱ्या दोघांना वनविभागाने ताब्यात घेतले आहे. ही कारवाई मंगळवारी करण्यात आली असून याप्रकरणी वनविभागाने वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संगमेश्वर तालुक्यातील मौजे कोंडीवरे येथील कणकीचे सपाट या भागात एका साबुदाणा बागेच्या संरक्षणासाठी विद्युत कुंपण (झटका मशीन) लावण्यात आले होते. या विद्युत प्रवाहाचा जोरदार धक्का लागल्याने दोन रानकुत्रे जागीच गतप्राण झाले. या घटनेची माहिती श्री. दिनेश राजाराम कदम यांनी वनविभागाला दिली. माहिती मिळताच वनविभागाचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. मात्र, सुरुवातीला घटनास्थळी पाहणी केली असता मृत प्राणी आढळून आले नाहीत. त्यानंतर अधिकाऱ्यांनी बागेची देखरेख करणाऱ्या कामगारांकडे कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.
चौकशीदरम्यान कामगारांनी मृत रानकुत्रे घटनास्थळावरून उचलून बागेतच खड्डा खणून पुरल्याचे कबूल केले आणि ती जागा दाखवली. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी सदर ठिकाणचा खड्डा उकरला असता, त्यात एक नर आणि एक मादी असे दोन रानकुत्रे मृतावस्थेत आढळून आले. यानंतर वनविभागाने तात्काळ कारवाई करत जॉर्ज पी. व्ही. (मूळ रा. कन्नूर, केरळ) आणि घनश्याम (मूळ रा. लखिमपूर, उत्तर प्रदेश) या दोन संशयितांना ताब्यात घेतले. हे दोघेही सध्या कोंडीवरे येथे वास्तव्यास आहेत. घटनास्थळावरून गुन्ह्यात वापरलेली तार, झटका मशीन, बॅटरी, वायर, चिमटा वायर आणि फावडा असे साहित्य जप्त करण्यात आले आहे.
ही कारवाई विभागीय वन अधिकारी (रत्नागिरी-चिपळूण) श्रीमती गिरिजा देसाई आणि सहाय्यक वनसंरक्षक श्रीमती प्रियंका लगड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या धडक कारवाईत परिक्षेत्र वन अधिकारी श्री. प्रकाश सुतार, वनपाल (संगमेश्वर-देवरुख) श्री. सागर गोसावी, तसेच वनरक्षक श्री. सुरज तेली, आकाश कडूकर, सहयोग कराडे, सुप्रिया काळे यांनी सहभाग घेतला. तसेच पोलीस पाटील राजेंद्र मेणे, दिनेश गुरव, झाकिर शेकासन, अंकित कदम आणि विजय कदम यांचेही सहकार्य लाभले.




