मुंबई महापालिकेच्या निवडणूकीसाठी मतदार यादी प्रसिद्ध! हरकती सूचना साठी २७ नोव्हेंबरची मुदत!! मुंबईत एकूण १ कोटी ३ लाख मतदार असून दुबार नावे चिन्हांकित!!!


मुंबई महापालिकेच्या वतीने निवडणूकीसाठी गुरुवारी २० नोव्हेंबरला मतदार यादी जाहीर करण्यात आली. प्रारुप मतदार यादीवर २७ नोव्हेंबरपर्यंत हरकती व सूचना नोंदवण्यात येणार आहे. तर ५ डिसेंबरला अंतिम मतदार यादी जाहीर होणार आहे. यावेळच्या मतदारयादीमध्ये दुबार नावे आणि वगळलेली नावे चिन्हांकित करण्यात आली आहेत. मतचोरीच्या आरोपप्रत्यारोपांमुळे यंदा मतदार यादीवर मोठ्या प्रमाणावर हरकती व सूचना येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मुंबईत एकूण १ कोटी ३ लाख मतदार आहेत. २०१७ मध्ये ही संख्या ९१ लाखांच्या आसपास होते.

राज्य निवडणूक आयोगाने सार्वत्रिक निवडणूकीसाठी मतदार यादी तयार करण्याचा कार्यक्रम जाहीर केला असून त्यानुसार २० नोव्हेंबरला मुंबई महापालिकेच्या निवडणूकीसाठी मतदार यादी जाहीर झाली. यापूर्वी मतदार यादी ६ नोव्हेंबरला जाहीर होणार होती, त्यानंतर त्याला १४ नोव्हेंबरची मुदत देण्यात आली होती. अखेर तिसऱ्यांदा मुदतवाढ दिल्यानंतर २० नोव्हेंबरला अखेर प्रारुप मतदार यादी जाहीर झाली आहे. मुंबई महापालिकेच्या २२७ प्रभागांसाठी मतदार यादी जाहीर करण्यात आली आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांसाठी १ जुलैपर्यंतची मतदार यादी पात्र ठरवण्याचा निर्णय राज्य निवडणूक आयोगाने घेतला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीसाठी स्वतंत्र मतदार यादी तयार केली जात नाही. भारत निवडणूक आयोगाने तयार केलेली मतदार यादी वापरली जाते. मात्र १ जुलै पर्यंतची मतदार यादी ही विधानसभा मतदारसंघनिहाय आहे.

ती प्रभाग निहाय फोडून त्याची प्रारुप यादी जाहीर करण्यात आली आहे. या मतदार यादीमध्ये दुबार नावे आणि वगळलेली नावे चिन्हांकित करण्यात आली आहे. या मतदार यादीबाबत काही आक्षेप असले तर मतदारांना २७ नोव्हेंबरपर्यंत सूचना व हरकती दाखल करता येणार आहेत. हरकती व सूचनांवर निर्णय घेऊन अंतिम मतदारयादी ५ डिसेंबरला जाहीर केली जाणार आहे.

हरकती व सूचनांचा पाऊस पडण्याची शक्यता यंदाच्या मतदारयादीवर हरकती व सूचनांचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मनसे आणि शिवसेना(ठाकरे) या पक्षांनी तसेच कॉंग्रेस पक्षानेही आपल्या कार्यकर्त्यांना मतदार यादी तपासून त्यातील चुका, दुबार नावे शोधण्यास सांगितले आहे. मनसचे यशवंत किल्लेदार यांनी सांगितले की २०२४ ची यादी आम्ही आधीच तपासली आहे ती यादी आताच्या यादीशी तपासून बघण्याच्या सूचना कार्यकर्त्यांना दिल्या आहेत. दोन याद्यांमध्ये काही फरक असेल तर घरोघरी जाऊन पडताळणी करून हरकती व सूचना नोंदवण्यास सांगण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button