तळवडे गावात ‘नेट द्या, मत घ्या’चा एल्गार!

अज्ञात व्यक्तीने लावलेल्या बॅनरची जोरदार चर्चा

चिपळूण : तालुक्यातील तळवडे गावात सध्या एक आगळावेगळे आंदोलन उभे राहत आहे. गावात इंटरनेटची सोय नसल्याने ग्रामस्थांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. शिक्षण, आरोग्य, बँकिंग, सरकारी सेवा अशा प्रत्येक बाबतीत इंटरनेट अत्यावश्यक झाले असतानाही गावात अद्याप एकाही टेलिकॉम कंपनीचा मोबाईल टॉवर उपलब्ध नाही.

या पार्श्वभूमीवर गावात एका अज्ञात व्यक्तीने लावलेला बॅनर मोठ्या चर्चेचा विषय ठरतोय. बॅनरवरील मजकूर “पुढाऱ्यांनी फुकट गावात फिरू नये आमच्या भावना समजून घ्या… नेट घा, मत घा” असा स्पष्ट संदेश देत आहे. याखाली “तळवडे गाव म्हणतंय – आता गावात इंटरनेट कनेक्शन पाहिजेच!” असा ठणकावलेला इशाराही दिला आहे.

सध्या निवडणुकांचा काळ सुरू असल्याने अनेक राजकीय पुढारी गावभेटी घेत आहेत. मात्र, स्थानिक नागरिकांनी आता विकासकामांशिवाय कोरे आश्वासने नाकारायची भूमिका घेतल्याचे या बॅनरवरून स्पष्ट दिसतं आहे.

गावातील तरुण, विद्यार्थी, शेतकरी आणि नोकरदार यांना इंटरनेटच्या अभावामुळे दररोज समस्या भोगाव्या लागतात. काही अत्यावश्यक माहिती पोहचवणे खूप अडचणी येत आहेत, एखादी दुःखद माहिती वेळेत न पोहचणे अशा अडचणींना सामोरे जावे लागत आहे तसेच ऑनलाईन शिक्षण, शासनाच्या योजना, बँक व्यवहार, रोजगाराच्या संधी या सर्व गोष्टींसाठी इंटरनेट आवश्यक असतानाही गावात आजही डिजिटल अंध:कार आहे.
हा बॅनर कोणी लावला हे अद्याप स्पष्ट झाले नसून, स्थानिक पातळीवर यावर अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. काही ग्रामस्थांनी याचे समर्थन केले असून, काहींनी ही एक योग्य वेळ आणि योग्य पद्धत असल्याचे म्हटले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button